
ईडी, सीबीआय आणि दहशतीला घाबरून पळून गेलेल्यांनी निष्ठांवतांवर बोलणे हा निष्ठावंतांचा, शिवसेना आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान आहे, असे म्हणत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी गद्दारांना झोडपले. दिल्लीत माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी मिंधे गटाचे आमदार कृपाल तुमाणे यांनी केलेल्या विधानाचा खरपूस समाचार घेतला.
संजय राऊत म्हणाले की, ज्यांचा स्वत:चा पक्ष भारतीय जनता पक्षामध्ये विलीन व्हायला निघाला आहे, ते दुसऱ्यांचे आमदार विलीन करण्याची भाषा करत आहेत. आज शिवसेनेमध्ये जे आमदार, खासदार आहेत तो निष्ठावांत लोकांचा पक्ष उरलेला आहे. ज्यांना जायचे होते तो गाळ निघून गेला. जे पैशाला विकत गेले, दहशत, सीबीआय, ईडीच्या धमक्यांना घाबरून निघून गेले त्यांनी आमच्या पक्षातील निष्ठावंतांवर बोलणे हा निष्ठावंतांचा, शिवसेचा आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान आहे.
आज ज्या कुणी आमदाराने हे भाष्य ते कधीकाळी शिवसेनेचे खासदार होते. आम्ही त्यांना निवडून आणलेले. आमच्याकडून गेल्यावर त्यांचा पराभव झाला. त्यांना मागच्या दाराने विधानपरिषदेमध्ये आणले. आता ते सांगताहेत हे फुटणार, ते फुटणार. तुमचे नशीब फुटले ते बघा, असा टोला राऊत यांनी लगावला. भविष्यामध्ये मिंधे गट भाजपमध्ये विलीन होत आहे. त्या संदर्भात चर्चा आणि बोलणी सुरू झालेली आहे, हे त्यांना माहिती नसावे, असेही राऊत म्हणाले.
फडणवीसांची राख करण्याचा प्रयत्न त्यांच्या सहकाऱ्यांनीच केला!
अनेकांना वाटले माझी राख होईल, पण मी भरारी घेतली, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात केले. याबाबत विचारले असता राऊत म्हणाले की, ते बरोबर बोलले आहेत. फिनिक्स पक्षी हा वारंवार राखेतून भरारी घेतो. त्याची पुन्हा पुन्हा राख होते, तो पुन्हा पुन्हा भरारी घेतो. म्हणजे त्यांनी शिवसेनेचे उदाहरण दिले. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी वारंवार शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न केला आणि शिवसेना पुन्हा पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे आकाशात झेप घेत राहिली. त्याच्यामुळे त्यांनी स्वत:ची तुलना फिनिक्स पक्षासोबत केली असेल याचा अर्थ त्यांची राख रांगोळी करण्याचा प्रयत्न त्यांच्या सरकाऱ्यांनीच केला. हे आम्ही मराठा आंदोलनात सुद्धा बघितले.
काय नौटंकी होते ते पाहू!
दरम्यान, पंजाबमध्ये पूर आला असून हजारो हेक्टरवरील शेती पाण्याखाली गेली आहे. जीवित आणि वित्तहानीही मोठ्या प्रमाणात झाली आहे. याची पाहणी करण्यासाठी पंतप्रधान मोदी पंजाबला जाणार असून लवकरच मणिपूरचा दौराही करणार आहेत. याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, कदाचित त्यांना उपरती झाली असेल. पंजाबमध्ये ते इतक्या उशिरा जात आहेत आणि मणिपूरला 3 वर्षांनी चालले आहेत. काय नौटंकी होते ते जातील तेव्हा पाहू, असे राऊत म्हणाले.