नौदल सैनिकाच्या वेषात आलेल्या अज्ञाताने पळवली शस्त्रे; शोधमोहीम सुरू

मुंबईतील कुलाबा येथे एका अज्ञात व्यक्ती नौदलाच्या सैनिकाची रायफल आणि काडतुसे घेऊन फरार झाल्याची घटना शनिवारी रात्री नेव्ही नगरमध्ये घडली आहे. या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणांकडून शोधमोहिम राबवण्यात येत आहे. शनिवारी रात्री नौदलाचा गणवेश घातलेल्या एका व्यक्तीने नेव्ही नगरच्या निवासी भागात ड्युटीवर तैनात असलेल्या अग्निवीरला तुझी ड्युटी संपली आहे, शस्त्रे मला द्या आणि थोडा आराम करा, असे सांगत फसवले आणि त्याची रायफल आणि जिवंत काडतुसे घेऊन फरार झाला. या घटनेबाबत नौदलाकडून माहिती देण्यात आली आहे.

एका अज्ञाताने स्वतःची ओळख नौदल अधिकारी म्हणून करून दिली. त्याने सैनिकाला सांगितले की, तुमची ड्युटी संपली आहे, मला शस्त्र द्या आणि जाऊन आराम करा. सैनिकाने अज्ञातावर विश्वास ठेवला आणि त्याला शस्त्रे दिली. त्यानंतर, अज्ञात व्यक्ती त्याचे शस्त्र घेऊन पळून गेली. काही वेळाने ती व्यक्ती नौदल अधिकारी नसून तोतया असल्याचे समजले.

याबाबत भारतीय नौदलाचे दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, मुंबईतील नौदलाच्या निवासी भागात ६ सप्टेंबर २५ रोजी रात्री एका तपास चौकीतून एक रायफल आणि दारूगोळा हरवल्याची तक्रार करण्यात आली. नौदलाच्या गणवेशातील एका कनिष्ठ सैनिक कर्तव्यावर असताना, त्याला नौदलाच्या गणवेशातील दुसऱ्या एका व्यक्तीने त्याची ड्युी संपल्याचे सांगत कर्तव्यातून मुक्त केले. त्याने आपल्याला या ठिकाणी पाठवण्यात आले आहे, असे सांगितले. त्याने सैनिकाकडून रायल घेतली. त्यानंतर त्याने त्या शस्त्रासह बेपत्ता झाला आहे. मुंबई पोलिसांच्या समन्वयाने हरवलेली शस्त्रे शोधण्यासाठी व्यापक शोध मोहीम सुरू आहे. घटनेची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. इतर सरकारी संस्थांकडूनही या प्रकरणाची चौकशी सुरू आहे आणि भारतीय नौदल या प्रयत्नांना आवश्यक ती सर्व मदत करत आहे, असे नौदलाने दिलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.