नेपाळच्या राष्ट्रपतींच्या निवासस्थानावर ‘Gen-Z’ आंदोलकांचा कब्जा, 5 मंत्र्यांचा राजीनामा, पंतप्रधान दुबईला पळण्याच्या तयारीत

नेपाळमध्ये हिंसक आंदोलन सुरुच असून काठमांडूच्या रस्त्यावर हजारो आंदोलक जाळपोळ, दगडफेक करत सुटले आहे. सोशल मीडियावरील बंदी उठवल्यानंतरही तरुणांनी आंदोलन सुरुच ठेवले आहे. त्यामुळे पंतप्रधान केपी ओली शर्मा यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीनंतर ते पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन दुबईला जाण्याची शक्यता आहे.

नेपाळ सरकारने सोशल मीडियावर बंदी घातल्यानंतर ‘जेन झी’ पिढी रस्त्यावर उतरली. ठिकठिकाणी जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक सुरू झाली. यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 20 जण ठार झाले, तर 400 हून अधिक जखमी झाले. तरुणांच्या उग्र आंदोलनाचा धसका बसलेल्या सरकारने देशभरात संचारबंदी लागू केली. राजधानी काठमांडूमध्ये लष्कराला पाचारण करण्यात आले असून दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर सोमवारी मध्यरात्री कॅबिनेटची बैठक पार पडली आणि सोशल मीडियावरील बंदी उठवण्यात आली. या निर्णयानंतरही काठमांडूतील निदर्शने थांबली नाहीत.

मंगळवारीही आंदोलक रस्त्यावर उतरले आणि पोलिसांवर दगडफेक केली. एवढेच नाही तर गृहमंत्री रमेश लेखक यांच्या घराची तोडफोड करत जाळपोळ केली. त्यानंतर आंदोलकांनी आपला मोर्चा राष्ट्रपती आणि कायदे मंत्र्यांच्या निवासस्थानाकडे वळवले. आंदोलकांनी तिथेही जाळपोळ केली. यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे.

पंतप्रधानांनी बोलावली तातडीची बैठक

नेपाळमध्ये हिंसक आंदोलन सुरुच असल्याने पंतप्रधान केपी ओली शर्मा यांनी सायंकाळी 6 वाजता सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. पंतप्रधान कार्यालयाने एक पत्रक जारी करत याबाबत माहिती दिली. तसेच नेपाळी जनतेला त्यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

पाचवा राजीनामा

दरम्यान, नेपाळ सरकारमधील आणखी एका मंत्र्याने राजीनामा दिला आहे. पाणी पुरवठा मंत्री प्रदीप यादव यांनी आंदोलानाला समर्थन देत आपल्या पदाचा राजीनामा दिला. सोशल मीडियावरील बंदीविरोधात सुरू झालेल्या आंदोलनानंतर आतापर्यंत पाच मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे.