
नेपाळ आणि फ्रान्समधील सत्ताविरोधी क्रांतीचे लोण अमेरिकेतही पोहोचले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा उजवा हात असलेले 31 वर्षीय तरुण नेते चार्ली कर्क यांची बुधवारी भरसभेत गोळी घालून हत्या करण्यात आली. सत्ताधीशांच्या विरोधातील रागातून हा हल्ला झाल्याचे बोलले जात आहे. या हल्ल्यामुळे ट्रम्प सरकारसह संपूर्ण अमेरिका हादरून गेली आहे.
युटा कॉलेज कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांना संबोधित करत असताना चार्ली कर्क यांच्यावर गोळी झाडण्यात आली. ही गोळी थेट त्यांच्या मानेत घुसली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. या हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात रक्तबंबाळ अवस्थेतील चार्ली गोळी लागल्याच्या ठिकाणी हात दाबून रक्तप्रवाह थांबवताना दिसत आहेत. तर, घाबरलेले विद्यार्थी आरडाओरडा करत पळताना दिसत आहेत.
हल्लेखोर काळ्या कपडय़ांमध्ये होता व त्याने इमारतीच्या छतावरून गोळी झाडल्याचा अंदाज आहे. संशयित हल्लेखोराचे स्पष्ट व्हिडिओ फुटेज तपास यंत्रणांना मिळाले आहेत, मात्र ते लगेचच सार्वजनिक केले जाणार नाहीत. आम्ही तंत्रज्ञानाच्या मदतीने हल्लेखोराची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यातून काही हाती न लागल्यास फूटेज जाहीर केले जातील व लोकांची मदत घेतली जाईल, असे स्थानिक पोलिसांनी सांगितले.
हल्लेखोर कॉलेज तरुणाच्या वयाचा
पोलिसांच्या माहितीनुसार, हल्लेखोर कॉलेज तरुणांच्या वयाचा असावा. विद्यार्थ्यांच्या गर्दीत तो सहज मिसळून गेला. त्यामुळे त्याची नेमकी ओळख पटवणे कठीण झाले आहे. चार्लीवर गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर ज्या जंगलात पळून गेला, तिथे एक उच्च क्षमतेची रायफल जप्त करण्यात आली आहे. त्या रायफलवर ट्रान्सजेंडर आणि फॅसिस्टविरोधी विचार कोरलेले आहेत, अशी माहिती एफबीआयने दिली आहे.
सत्ताधीशांच्या विरोधातील रागातून हा हल्ला झाल्याचे बोलले जात आहे. या हल्ल्यामुळे ट्रम्प सरकार हादरले आहे.
सूड घेणार – ट्रम्प
‘डाव्या विचारसरणीच्या लोकांकडून केली जाणारी वक्तव्ये चार्लीच्या मृत्यूस जबाबदार आहेत. गेल्या काही दिवसांपासून देशात जे दहशतवादी वातावरण तयार झाले आहे, त्याला हीच विचारसरणी कारणीभूत आहे. चार्लीच्या हत्येमध्ये ज्या कोणाचा सहभाग आहे, त्या प्रत्येकाला शोधून काढणार आणि सूड घेणार,’ अशी प्रतिज्ञाच डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे.
राष्ट्रध्वज अर्ध्यावर
ट्रम्प यांनी कर्क यांच्या हत्येचा तीव्र निषेध केला आहे. कर्क यांना श्रद्धांजली म्हणून अमेरिकेचा राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्याची घोषणा केली आहे. ‘चार्ली हा माझा महत्त्वाचा व प्रिय सहकारी होता. अमेरिकेतील तरुणाईची नस अचूक समजणारा त्याच्यासारखा दुसरा कोणीच नव्हता. तो सगळय़ांचा आवडता होता, असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.