एल्फिन्स्टन पूल आजपासून बंद

परळ-प्रभादेवीला जोडणारा 100 वर्षं जुना एल्फिन्स्टन उड्डाणपूल हा अखेर उद्या शुक्रवारी रात्रीपासून बंद होणार आहे. उड्डाणपूल परिसरातील बाधित होणाऱया रहिवाशांनी कडाडून विरोध केल्यामुळे गेल्या कित्येक दिवसांपासून हा उड्डाणपूल बंद होऊ शकला नव्हता. आता मात्र बंदची कार्यवाही होणार आहे. तशी अधिसूचनाच आज वाहतूक पोलिसांकडून जारी करण्यात आली.

मुंबई महानगर विकास प्राधिकरण विभागामार्फत हा जुना पूल जमीनदोस्त करून तेथे नवीन उड्डाणपूल व शिवडी-वरळी एलिव्हेटेड कनेक्टर उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. या कामासाठी एमएमआरडीएने आवश्यक त्या सर्व परवानग्या व नाहरकती मिळविल्या आहेत. परंतु या पुलाच्या आजुबाजूला असलेल्या 19 इमारतींमधील रहिवाशी बाधित होणार आहेत. त्यांच्या पुनर्वसनासह विविध मागण्या असून त्या पूर्ण करा मगच कामाला सुरुवात करा, अशी त्यांची भूमिका आहे. जनमताच्या रेटय़ामुळे दोन वेळा बंद करत असल्याचे घोषित करूनही उड्डाणपूल बंद करता आला नव्हता. परंतु आता वाहतूक विभागाने नवा अध्यादेश जारी करत शुक्रवार 12 सप्टेंबरच्या रात्री 12 वाजल्यापासून एल्फिन्स्टन उड्डाणपूल बंद करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे प्रवाशी व नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे.

हटणार नाही, बंद होऊ देणार नाही
बंदच्या पोस्टर्संना काळे फासल्यानंतर आज रहिवाशांचे प्रतिनिधी आणि पोलिसांमध्ये भोईवाडा पोलीस ठाण्यात एक बैठक पार पडली. या वेळी शासनाने मागच्या वेळेस दिलेले आश्वासन पाळावे, आम्हाला लेखी करारपत्र द्यावे तरच आम्ही सहकार्य करू, अशी भूमिका रहिवाशांच्या प्रतिनिधींनी मांडली. चर्चेअंती रहिवाशांचे म्हणणे संबंधित वरिष्ठ अधिकाऱयांपुढे ठेवू, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. याप्रसंगी शिवसेना आमदार महेश सावंत, माजी नगरसेविका उर्मिला पांचाळ, मनसेचे मुनाफ ठाकूर तसेच अन्य पक्षांचे स्थानिक पदाधिकारीदेखील उपस्थित होते.

बाधित इमारतीमधील रहिवाशांचे पुनर्वसन होणार

रहिवाशांकडून होणऱया तीव्र विरोधानंतर लक्ष्मी निवास व हाजी नुरानी चाळ या बाधीत इमारतींमधील रहिवाशांचे पुनर्वसन त्याच परिसरातील म्हाडाच्या इमारतींमध्ये करण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. मात्र, पुलाच्या परिसरातील सतरा इमारतींबाबत कोणताही निर्णय न घेतल्यामुळे या रहिवाशांमध्ये नाराजीचा सूर कायम आहे.

बंद झाल्यानंतर वाहतूक व्यवस्था

n पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणाऱया वाहनांकरिता ः

1) दादर पूर्वकडून पश्चिमकडे व मार्पेटकडे जाणारे वाहन चालक हे टिळक ब्रिजचा वापर करतील. 2) परेल पूर्वकडून प्रभादेवी व लोअर परेलला जाणारे वाहन चालक हे करी रोड ब्रिजचा वापर करतील (07ः00 वा. ते 15ः00 वा. पर्यंत). 3) परेल, भायखळा पूर्वकडून प्रभादेवी, वरळी, कोस्टल रोड व सि-लिंकच्या दिशेने जाणारे वाहन चालक हे चिंचपोकळी ब्रिजचा वापर करतील.

n पश्चिमेकडून पूर्वकडे जाणाऱया वाहनांकरिता ः

1) दादर पश्चिमेकडून दादर पूर्वकडे जाणारे वाहन चालक हे टिळक ब्रिजचा वापर करतील. 2) प्रभादेवी व लोअर परेल पश्चिमेकडून परेलला, टाटा रुग्णालय व के. ई. एम. रुग्णालय येथे जाणारे वाहन चालक हे करी रोड ब्रिजचा वापर करतील (15ः00 वा. ते रात्रौ 23ः00 वा. पर्यंत). 3) कोस्टल रोड व सि-लिंकने व प्रभादेवी, वरळीकडून परेल, भायखळा पूर्वकडे जाणारे वाहन चालक हे चिंचपोकळी ब्रिजचा वापर करतील.

दुहेरी मार्ग आणि रुग्णवाहिका

n सेनापती बापट मार्ग ः वडाचा नाका ते फितवाला जंक्शन पर्यंत दुहेरी मार्ग चालू राहील.
n परेल व प्रभादेवी परिसरातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये रुग्णालयात जाण्या व येण्यासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरण विभाग मार्फत दोन रुग्णवाहिकांची सोय करण्यात आलेली आहे.

रहिवाशांचा कडाडून विरोध

बुधवारी बंदचे पोस्टर्स लावल्यानंतर रहिवाशांनी ते उखडले. त्यानंतर आज भोईवाडा पोलीस ठाण्यात एक बैठक झाली. आमचा प्रश्न योग्यरित्या मार्गी लावला नाही तर आम्ही घर सोडणार नाही. इमारतीतून हटणार नाही आणि उड्डाणपूल बंदही होऊ देणार नाही, असा पवित्रा 19 इमारतींमधील रहिवाशांनी यावेळी घेतला.