
महायुती सरकारच्या काळात गंभीर नागरी समस्या, ढासळलेल्या कायदा व सुव्यवस्थेमुळे जिल्हावासीय त्रस्त झाले आहेत. या सरकारच्या भ्रष्ट कारभाराचा बुरखा फाडण्यासाठी, जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी शिवसेना व मनसे उद्या शुक्रवारी, 12 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर संयुक्त जनआक्रोश मोर्चा काढणार आहे. गेले तीन आठवडे मतदारसंघनिहाय नियोजन करण्यात आले असून, हा विराट मोर्चा सत्ताधाऱ्यांना धडकी भरवणारा ठरणार आहे. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, मनसे नेते बाळा नांदगावकर, मनसे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे हे यावेळी उपस्थित राहणार आहेत.
कर्जमुक्ती न करता सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली. शेतमालाचे कोसळलेले बाजारभाव, खते-बियाण्यांचे गगनाला भिडलेले दर यामुळे बळीराजा कर्जबाजारी झाला आहे. वाढती महागाई, बेरोजगारीने जनता त्रासली आहे. शहरात गुंडगिरी वाढली असून, अमली पदार्थ, ऑनलाईन जुगार असे अवैध धंदे राजरोस सुरू आहेत. हनीट्रॅप, हत्या, महिलांवरील अत्याचाराने भीतीचे वातावरण पसरले आहे. नियमबाह्य स्मार्ट मीटरची सक्ती करून महावितरणने लूट सुरू केली आहे. महापालिका भ्रष्टाचाराचे कुरण झाले आहे. रस्त्यांची दुर्दशा, कृत्रिम पाणीटंचाई, शाळांची दुरवस्था, आरोग्य सेवेचा उडालेला बोजवारा याकडे सरकारने कानाडोळा केला आहे. या सर्व प्रश्नी शिवसेना, मनसे सरकारला जाब विचारण्यासाठी उद्या शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढणार आहे.
या मोर्चात शिवसेना खासदार राजाभाऊ वाजे, उपनेते सचिन अहिर, दत्ता गायकवाड, मनसे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील, विनायक पांडे, जयंत दिंडे, डी. जी. सूर्यवंशी, नितीन आहेर, वसंत गीते, अनिल कदम, प्रवीण नाईक, पवन ठाकरे, प्रथमेश गीते, सलीम शेख, अंकुश पवार, सुदाम कोंबडे, सुजाता डेरे, रतनकुमार इचम, केशव पोरजे, भारती ताजनपुरे आदींसह जिह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरीक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
या मोर्चाला सकाळी 11 वाजता बी. डी. भालेकर मैदानावरून सुरुवात होईल. गंजमाळ सिग्नल, दूध बाजार, संत गाडगे महाराज पुतळा, रविवार कारंजा, रेडक्रॉस सिग्नल, महात्मा गांधी रस्ता मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर हा विराट मोर्चा धडकेल.