
जगप्रसिद्ध वेरुळ लेण्यांसमोरील भागात असलेल्या स्टेट बँकेच्या एटीएमवर चोरट्यांनी बुधवारी मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास डल्ला मारत एटीएमसह सोळा लाख रुपयांची रोकड लंपास केली. यामुळे वेरूळसह परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांसमोर चोरट्यांना जेरबंद करण्याचे आव्हान उभे राहिले आहे.
काही अज्ञात चोरट्यांनी बुधवारी रात्री तीन वाजता 16 लाख 7 हजार 100 रुपये असलेले एटीएम मशीनच चोरले.चोरट्यांनी एटीएम मशीनसह रोकड पळवून नेल्याचे लक्षात येतात बँकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रत्नपूर पोलिसांना याविषयीची माहिती दिली. पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. रोख व एटीएमसह फरार झालेल्या चोरट्यांना जेरबंद करण्यासाठी तपास सुरू केला. श्वानपथक, फॉरेन्सिक विभागाचे कर्मचारी तसेच स्थानिक पोलीस प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पथकांनी दिवसभर वेरुळ लेणी, घृष्णेश्वर मंदिर आणि गाव परिसरामध्ये असलेल्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली.