Video – कर्नाटकात गणेश विसर्जन मिरवणुकीत भरधाव ट्रक घुसला; 8 जणांचा मृत्यू, 25 गंभीर जखमी

कर्नाटकमधील हासन जिल्ह्यामध्ये भीषण अपघात झाला आहे. शुक्रवारी गणेश विसर्जन मिरवणूक सुरू असताना भरधाव ट्रक गर्दीत घुसला. एनएच-373 वर झालेल्या या अपघातामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला, तर 25 हून अधिक जखमी झाले आहेत. या अपघाताचा थरकाप उटवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हासन जिल्ह्यातील होलेनारसीपुरा येथील मोसले होसहल्लीजवळ गणपती विसर्जन मिरवणूक सुरू होती. डीजेच्या तालावर गणेशभक्तांचा नाच सुरू होता आणि त्याचवेळी भरधाव वेगातील ट्रक विसर्जन मिरवणुकीमध्ये घुसला. दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि ट्रक मिरवणुकीत घुसल्याची माहिती मिळतेय.

या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला असून 22 जण जखमी झाले आहेत. जखमींवर केआरएमएस रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापैकी एकाची प्रकृती गंभीर असून त्याला पुढील उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस अपघातामागील कारणांचा तपास करत आहेत. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार ट्रक आधी डिव्हायडरला धडकला आणि त्यानंतर गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला. या गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये इंजिनियरिंगचे विद्यार्थी सहभागी झाले होते अशीही प्राथमिक माहिती मिळतेय. पोलीस पुढील तपास करत आहेत, अशी माहिती हासन जिल्ह्याच्या उपायुक्त केएस लता कुमारी यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हासन जिल्ह्यात झालेल्या भीषण अपघातावर शोक व्यक्त केला आहे. हासन जिल्ह्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत ट्रक घुसून अनेकांचा मृत्यू झाला तर 20 हून अधिक गंभीर जखमी झाले आहेत. राज्य सरकारकडून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येक 5-5 लाख रुपयांची मदत दिली जाईल. तसेच जखमींच्या उपचारांचा खर्च राज्य सरकार करेल, अशी घोषणा सिद्धरामय्या यांनी एक्सवर पोस्ट करून केली.

कुमारस्वामी यांचे ट्विट

केंद्रीय मंत्री एचडी कुमारस्वामी यांनीही ट्विट करत अपघाताबाबत शोक व्यक्त केला आहे. हासन तालुक्यात गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी झालेल्या अपघाताचे वृत्त ऐकून धक्का बसला. या अपघातात अनेकांचा मृत्यू झाला असून 20 हून अधिक जखमी झाले आहेत. ही अत्यंत दु:खद घटना आहे. देव मृतांच्या आत्म्यांना शांती देवो आणि शोकाकूल कुटुंबांना हे दु:खथ सहन करण्याची ताकद देवो. सर्व जखमी लवकरात लवकर बरे व्हावे अशी मी प्रार्थना करतो. तसेच जखमींना योग्य मोफत उपचारांसाठी राज्य सरकारने पावले उचलावीत, असे ट्विट कुमारस्वामी यांनी केले.