माकडाची दुचाकीवर झडप अपघातात पती ठार; पत्नी जखमी

दुचाकीवरून पडून डोक्याला मार लागल्याने चालकाचा मृत्यू झाला, तर महिला जखमी झाल्याची घटना महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा रस्त्यावर चिखली परिसरात घडली, तर खाद्याच्या शोधात असलेल्या माकडाने दुचाकीवर झडप घातल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

आनंद जाधव (वय 50, रा. देवळी) असे मयताचे नाव आहे. आनंद जाधव हे गुरुवारी – सायंकाळी महाबळेश्वर शहरातून आपली कामे उरकून पत्नीसमवेत दुचाकीवरून देवळी या आपल्या गावाकडे निघाले होते. तापोळा मुख्य रस्त्यावर चिखली परिसरात दुचाकीवर माकडाने झडप मारल्याने त्यांचा दुचाकीस्वराचा ताबा सुटून ते खाली पडले. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. आजूबाजूच्या नागरिकांनी त्यांना उपचारासाठी महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले; परंतु उपचारापूर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मयत घोषित केले. त्यांच्या पत्नीवर उपचार सुरू आहेत. या घटनेची रात्री उशिरा महाबळेश्वर तालुका पोलीस ठाण्यात नोंद झाली.