
>> अक्षय मोटेगावकर, [email protected]
आज अनेकविध माध्यमांतून आपल्याला माहिती उपलब्ध होते. यातीलच एक पॉडकास्ट. विविध क्षेत्रातील तज्ञ, वक्ते यांच्याशी बातचित करत विविध विषय या व्यासपीठावर उलगडले जातात. त्यातून काय निवडावे, काय ऐकावे हे सांगणारे सदर.
दो गज की दूरी और मास्क है जरूरी’चा कोरोनाचा काळ. तेव्हापासून रोजच्या प्रवासातला ‘मी टाईम’ हा स्वतसाठीचा वेळ खऱया अर्थाने स्वतसाठी असावा याच शोधातून कितीतरी काही ऐकलं गेलं. माझी ऐकण्याची, करमणुकीची गरज ‘ऐकावे जनांचे’ या माझ्या पुरत्या शोधाची जननी ठरली. यूटय़ूब, अॅमेझान प्राईम, अॅपल पाडकास्टस्, TED Talks (टेड टॉक्स) , अॅाडिबल, स्पाटिफाय यांसारखे प्लॅटफार्म्स एका क्लिकवर दिमतीला उभे राहिले आणि मग वेगवेगळी भाषणे, ऑडिओ बुक्स, पॉडकास्टस्, मुलाखती आणि एकल प्रयोग ऐकायची सवय लागली. प्रवासात पाहता येणे शक्य नसल्याने ऐकणे हेच इष्ट ठरले आणि ऐकण्याचा हा प्रवास कुठल्याही विषयाच्या बंधनाशिवाय सुरू झाला.
यूटय़ूबवर आतासारखा जाहिरातींचा भडिमार नव्हता. यूटय़ूब हे सहजगत्या आणि विनाछदाम उपलब्ध असणारे माध्यम जिथे उत्तमोत्तम आणि उत्कृष्ट माहितीचा, ज्ञानाचा खजिना आहे. यूटय़ूबवरच मी ज्येष्ठ सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी सरांच्या आधुनिक भारत, भारतीय इतिहास, प्रेरणादायी कथांच्या विविध भाषण शृंखला ऐकल्या. आयआयटी, आयआयएम, यूपीएससीसाठीची तयारी करून घेणाऱया देशातील अग्रगण्य अशा प्रोफेशनल टय़ुटोरियल्सचे संस्थापक संदीप मानुधनेंचे कॅपिटॅलिझम, सोशॅलिझम, कम्युनिझम, ग्रेट डिक्टेटर्स ऑफ हिस्ट्री, महायुद्ध आणि जगाचा इतिहास यांसारख्या विषयांवरची भाषणे ऐकली. विवेक बिंद्रा, संदीप माहेश्वरी यांची भाषणे, सेमिनार्स ऐकली. निनादराव बेडेकरांची भाषणे ऐकताना जाणवत होतं की, शिवाजी महाराज आणि त्यांची थोरवी हे फारच त्रोटकपणे आपल्याला माहीत आहे. शिवाजी महाराज खऱया अर्थाने किती ग्रेट होते याची झलक ऐकायची असेल तर निनादरावांकडूनच शिवचरित्राची ओळख व्हायला हवी. गुलजार, पीयूष मिश्रा, राहत इंदोरी, जौन एलिया, मनोज वाजपेयी, आशुतोष राणा, मनोज मुंतशीर या हिंदी/ उर्दू अदबीतील कलाकारांना प्रचंड ऐकले. डा. कुमार विश्वासांच्या ‘अपने अपने राम’ याची तर पारायणे झाली. त्यांच्या ‘तर्पण’ या हिंदी साहित्यातील शृंखलेने तर हिंदी साहित्यात रुची निर्माण केली.
नोकरीच्या क्षेत्रातील ज्ञान आणि कौशल्ये सतत वृद्धिंगत केली पाहिजेत या दंडकावरून बिझनेस व्यवस्थापन, मानववंशशास्त्र या क्षेत्रातील महनीय प्रभृतींची खूप सारी भाषणे ऐकली. साहित्य क्षेत्रातील अनेकांची भाषणे, मुलाखती ऐकल्या. ‘द अनुपम खेर शो’, ‘जिंदगी विथ रिचा’, ‘स्वर्णीम भारत’, ‘साहित्य तक’, ‘सुखन’, ‘रेख्ता’चे सगळे भाग ऐकले. ‘उपनिषद गंगा’चे पूर्ण भाग ऐकले. स्पाटिफायवर श्रीकांत केकरेचे ‘अभिव्यक्ती’, अॅमेझॉन प्राईमवर देवदत्त पटनायक यांची ‘बिझनेस सूत्राज’ ही शृंखला, TED talks ची खूप सारी भाषणे, वेगवेगळे ऑडिओ बुक्स, दिग्गज गायकांचे गायन, इंग्रजी साहित्यातील कविता आणि बुक समरीज पण ऐकल्या.
हे आणि असं खूप जण पाहतात आणि ऐकतातसुद्धा. मग माझं विशेष असं काय? तर या सगळ्यात मी स्वत प्रचंड समृद्ध होत गेलो. वेगवेगळ्या विचारधारांची, संकल्पनांची ओळख झाली. नवंनवं खूप काही शिकायला मिळालं. दृष्टी विस्तारली, समज प्रगल्भ झाली आणि परिप्रेक्ष्य बदलले. मुख्य म्हणजे सोशल मीडिया आणि ओटीटीचा सहज सुळसुळाट असण्याच्या काळात बघण्यापेक्षा ऐकण्याची सवय वृद्धिंगत होऊ लागली. या ऐकण्याच्या क्षमतेचा वैयक्तिक, व्यावसायिक आयुष्यात फायदा होऊ लागला. चांगले कान चांगली मने जोडतात हे उमगले आणि हे सगळं होत असताना समर्थांची शिकवण समोर दिसायची. ‘जे जे आपणांसी ठावे ते ते इतरांसी सांगावे…’ हा प्रयत्न. या माहिती आणि ज्ञानाच्या वैश्विक यज्ञात आपल्याही काही समिधा टाकाव्यात यासाठी हे लिखाण. बघू या हे तुम्हालाही भावले तर! चला पाहू या, ऐकू या आणि त्यावर बोलू या!