
जालना शहरात सोमवारी दुपारी चार वाजेपासून पावसाला सुरुवात झाली होती. पावसाची संततधार रात्री दहा वाजेपर्यंत सुरू होती. रात्री दहा वाजेनंतर शहरात जोरदार पावसाला सुरुवात झाली. विजांच्या कडकडाटसह मेघागर्जनेत मंगळवारी १६ सप्टेंबर रोजी पहाटेपर्यंत शहरात पाऊस सुरू होता. या पावसामुळे मध्यरात्रीनंतर संपूर्ण शहरातील वीज ही गुल झाली हाती.
जोरदार पावसामुळे शहरातून वाहणाऱ्या सीना – कुंडलिका नदीला पूर आला होता. लक्कडकोट, राजमल टाकी, बस स्थानक आदी पुलावरून नद्यांचे पाणी वाहिले. शिवाय लक्कडकोट परिसरातील कुंडलिका नदी पात्राचे पाणी शिरले होते. या पावसामुळे आमदार अर्जुन खोतकर, माजी आमदार राजेश टोपे यांची निवासस्थानी असलेल्या भाग्यनगर भाग पाण्याखाली गेला आहे.
याशिवाय मंमादेवी ते रेल्वे स्थानक मार्गावरील अनेक हॉटेलसह इतर दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. शहरातील गुरु भवन भागात ही पावसाचे पाणी साचले होते. तसेच रात्री बस स्थानक परिसर ही जलमय झाले होता. या पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले असून संसार उपयोगी वस्तूंचे नुकसान झाले आहे. दरम्यान सीना- कुंडलिका नदीचा पूर ओसरला असून नदी सध्या दुथडी भरून वाहत आहे.
जालना शहरातील बस स्टँड परिसरात असलेल्या पुलावरून पाणी गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. जालना शहरातून छत्रपती संभाजीनगर मार्गे पुणे आणि इतर शहरात जाणारी बस सेवा देखील विस्कळीत झाली आहे. शहरातील दोन्ही कुंडलिका आणि सीना नद्यांना पूर आल्याने अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरलं आहे. अन्नधान्याचं नुकसान झालं असून घरगुती सामान वाहून गेलं आहे.




























































