
केंद्र सरकारने बेटिंग आणि जुगाराशी संबंधित ऑनलाईन गेमिंग प्लॅटफॉर्मना लक्ष्य करणारे कठोर विधेयक मंजूर केले होते. त्यामुळे BCCI सोबतचा Dream 11 चा डाव अर्ध्यात मोडला. यामुळे Asia Cup 2025 मध्ये हिंदुस्थानचा संघ जर्सी ‘स्पॉन्सर’विना मैदानात उतरला आहे. अशातच आता टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या रिपोर्टनुसार टीम इंडियाच्या जर्सीवर ‘Apollo Tyres चं नाव झळकणार आहे. अपोलो टायर्स सोबतचा हा प्रायोजकत्व कालावधी 2027 पर्यंत असणार आहे.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, ड्रीम 11 प्रत्येक सामन्यासाठी 4 कोटी रुपये BCCI ला देत होती. मात्र, अता अपोलो टायर्स प्रत्येक सामन्यासाठी BCCI ला 4.5 कोटी रुपये आणि ICC स्पर्धांमध्ये होणाऱ्या सामन्यांसाठी 1.72 कोटी रुपये मोजणार आहे. म्हणजेच अपोलो टायर्स प्रयोजकत्व कालावधीत 579.06 कोटी रुपये खर्च करणार आहे. 16 सप्टेंबर रोजी अपोलो टायर्स व्यतिरिक्त ‘Canva’ आणि ‘JK Tyres’ या कंपन्यांनी सुद्धा टीम इंडियाच्या जर्सीवर झळकण्यासाठी बोली लावली. परंतु अपोलो टायर्सने अतिरिक्त किंमत मोजत बाजी मारली. तत्पूर्वी बीसीसीआयने जारी केलेल्या निवेदनात स्पष्ट सुचना केल्या होत्या की, बेटिंग, गेमिंग, क्रिप्टो आणि जुगाराशी संबंधित कंपन्यांना बोली लावण्याची परवानगी नाही.
अपोलो टायर्स कंपनीसोबत जर बीसीसीआयने करार केला तर, पुढच्या महिन्यात होणाऱ्या वेस्ट इंडिजच्या हिंदुस्थान दौऱ्यावर टीम इंडियाचे खेळाडू ‘Apollo Tyres’ नावाची जर्सी परिधान करून मैदानात उतरतील. टीम इंडिया आणि वेस्ट इंडिजमध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. पहिला सामना 2 ऑक्टोबर रोजी अहमदाबाद आणि दुसरा कसोटी सामना 10 ऑक्टोबर रोजी दिल्लीमध्ये खेळला जाणार आहे.