मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना, नांदेडात महाविकास आघाडीच्या वतीने निषेध

मुंबईतील दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे असलेल्या स्वर्गीय मीनाताई बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याची अज्ञात व्यक्तीने विटंबना केली. त्या घटनेचे नांदेड शहरात तीव्र पडसाद उमटले आहेत. माथेफिरूला दोन दिवसात अटक न केल्यास नांदेड शहर बंदचे आवाहन नांदेड महानगर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे करण्यात आले आहे. तसेच आज महाविकास आघाडी तर्फे सदरील घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला.

नांदेड लोकसभेचे खासदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करून घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. सदरील घटना अत्यंत निंदनीय असून अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर महाविकास आघाडी खपवून घेणार नाही, असा इशारा रवींद्र चव्हाण यांनी दिला. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी स्वर्गीय माँ साहेब यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करून वरील घटनेचा निषेध नोंदविला तसेच विटंबना करणार्‍या माथेफिरूला दोन दिवसात अटक न केल्यास नांदेड महानगर शिवसेनेतर्फे नांदेड बंदचे आवाहन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे महानगरप्रमुख प्रकाश मारावार यांनी दिला.

यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार हणमंत पाटील बेटमोगरेकर, लातूरचे संपर्कप्रमुख माजी आमदार रोहिदास चव्हाण, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश पावडे, काँग्रेसचे महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार, उपमहापौर आनंद चव्हाण, श्रावण रॅपनवाड, डॉ.सुनिल कदम, प्रा.यशपाल भिंगे, भगवानराव आलेगावकर, कम्युनिस्ट पार्टीचे गंगाधर गायकवाड, कॉम्रेड उज्वला पडलवार, विठ्ठल पावडे, शिवसेना जिल्हाप्रमुख भुजंग पाटील, जिल्हाप्रमुख बबन बारसे, महानगर प्रमुख प्रकाश मारावार, शहर प्रमुख जितू सिंग टाक, महानगरप्रमुख दक्षिण मनोज यादव, नवज्योतसिंग गाडीवाले, उपजिल्हाप्रमुख विजय बगाटे, शहरप्रमुख आनंद जाधव, शहरप्रमुख अर्जुन ठाकूर, माधवराव कल्याणकर, निवृत्ती जिंकलवाड, ब्रिजलाल उगवे, गौरव दरबस्तवार, नंदू वैद्य, सुनील कदम, सतीश उमरेकर, पुरुषोत्तम धोंडगे, करण इटकल, हनुमंत भवर, डॉ.पेनुरकर हे उपस्थित होते.