भाज्या स्वस्त… पितरं खूश; गेल्या आठवड्याच्या तुलनेत निम्म्याने दर उतरले

मागणीच्या तुलनेत जास्त होत असलेला पुरवठा आणि लागोपाठ चार दिवस पडलेल्या पावसामुळे ग्राहकांनी बाजाराकडे पाठ फिरवल्याने नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये भाज्या स्वस्त झाल्या आहेत. गेल्या आठवड्याच्या तुलनेत भाज्यांचे दर जवळपास निम्म्याने कमी झाले आहेत. ७० रुपये किलो दराने विकली जाणारी भेंडी आता ३० रुपयांवर तर २०० रुपये दराने विकली जाणारी गवार आता थेट ८० रुपयांवर आली आहे. पितृपक्षात भाज्या स्वस्त झाल्याने वाडीच्या पानात भाज्यांची रेलचेल असल्याने पितरं खूश होतील अशी श्राध्द घालणाऱ्यांची भावना असली तरी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

गणेशोत्सव आणि पितृपक्षाच्या सुरुवातीला भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाली होती. मात्र आता एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाल्याच्या गाड्यांची आवक ६५० च्या पुढे गेली आहे. त्यामुळे भाज्यांचे दर गेल्या आठवड्याच्या तुलनेत निम्म्याने कमी झाले आहेत. गेली चार दिवस मुंबईसह एमएमआरडीए क्षेत्रात धो धो पाऊस कोसळला. त्यामुळे किरकोळ व्यापाऱ्यांकडे ग्राहकांनी पाठ फिरवली. परिणामी हे व्यापारी एपीएमसीच्या ठोक मार्केटकडे फिरकले नसल्याने मोठ्या प्रमाणात भाजीपाला पडून राहिला आहे. पितरांच्या वाडीसाठी लागणाऱ्या भाज्य सोडल्या तर अन्य भाज्या कवडीमोल दराने विकल्या जात आहेत. टोमॅटोचा दर १२ तर फ्लॉवरचा दर १५ रुपयांवर आला आहे असे घाऊक व्यापारी शंकर फडतरे यांनी सांगितले. भाज्या स्वस्त झाल्या असल्या तरी किरकोळ बाजारात मात्र भाज्या चढ्या दराने विकल्या जात आहेत.