
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर मतचोरीचे आरोप केले. निवडणूक आयोग मतदार यादीतून लोकांची नावे वगळत आहे आणि त्यासाठी बनावट मोबाईल नंबर वापरत आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. याबाबत बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी निवडणूक आयोगाला चांगलंच फटकारलं आहे. ”जनाची नाही तर मनाची लाज बाळगा आणि कबूल करा’, असे सावंत यांनी निवडणूक आयोगाला सुनावलं.
”राहुल गांधी यांनी जी पत्रकार परिषद दिल्लीत घेतलेली त्यात कशाप्रकारे वोट चोरी होते ते दाखवलं होतं. आता ते वेगवेगळी रोज माहिती समोर आणंत आहेत. आता जनाची नाही तर मनाची लाज निवडणूक आयोगाला असेल तर त्यांनी धमक्या देण्यापेक्षा स्वत:त सुधारणं करणं आवश्यक आहे. कबूल करा की तुम्ही हे सगळं करता. यामागे कोण आहे ते वेगळं सांगायची गरज नाही. देशात सत्ता कुणाची आहे. ती सगळी माणसं हे सगळं करत असतात”, असं ते म्हणाले.
निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील मतदानाचे सीसीटीव्ही फुटेज द्यायला नकार देण्याच्या निर्णयाचा देखील खरपूस समाचार घेतला. ”महाराष्ट्रात आजही सीसीटीव्ही का देत नाही हा प्रश्न मला कायम पडतो. महिलांची प्रायव्हसी हे जे काही कारण देतात मला काही कळत नाही. इतका विद्वान आयुक्त आपल्याला मिळालेला आहे. रांगेत उभ्या महिलांचे सीसीटीव्ही फुटेज द्यायला ते प्रायव्हसीचं कारण दिलं जातं त्यावेळी समजून गेलं पाहिजे की चोरी नक्की झालेली आहे. चोर लोकं तिथे बसलेले आहेत”, असे अरविंद सावंत म्हणाले.






























































