Book Ban: तालिबानचा नवा फतवा, महिलांनी लिहिलेली पुस्तके अफगाण विद्यापीठांमधून हटवली

book-ban-taliban-removes-women-authored-books-from-afghan-universities

अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकारने महिलांनी लिहिलेली पुस्तके विद्यापीठांमधील अभ्यासक्रमातून काढून टाकली आहेत. या नव्या बंदीमुळे आता मानवाधिकार आणि लैंगिक छळासारखे विषयही शिकवता येणार नाहीत, अशी माहिती समोर आली आहे.

‘बीबीसी’ने दिलेल्या वृत्तानुसार, एकूण ६८० पुस्तकांवर ‘चिंताजनक’ म्हणून शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. यापैकी १४० पुस्तके महिलांनी लिहिलेली आहेत. यात ‘सेफ्टी इन द केमिकल लॅबोरेटरी’ (Safety in the Chemical Laboratory) सारख्या पुस्तकांचाही समावेश आहे. ही पुस्तके ‘शरियाविरोधी आणि तालिबानच्या धोरणांच्या विरोधात’ असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

१८ विषय अभ्यासक्रमातून वगळले

तालिबानने १८ विषय शिकवण्यावरही बंदी घातली आहे. एका तालिबान अधिकाऱ्याने सांगितले की, हे विषय ‘शरियाच्या तत्त्वांच्या आणि सरकारच्या धोरणांच्या विरोधात’ आहेत. तालिबानने पुन्हा सत्ता हाती घेतल्यापासून चार वर्षांत अनेक बंधने लादली आहेत. याच आठवड्यात ‘अनैतिकता’ थांबवण्यासाठी १० प्रांतांमध्ये फायबर-ऑप्टिक इंटरनेटवर बंदी घालण्यात आली आहे.

मुलींना सहावीच्या पुढे शिक्षण घेण्यास बंदी!

या नियमांचा समाजातील अनेक पैलूंवर परिणाम झाला असला तरी, महिला आणि मुलींवर त्याचा सर्वाधिक परिणाम झाला आहे. त्यांना सहावीच्या पुढे शिक्षण घेण्यास बंदी आहे.

महिलांवर आधारित विषयही निशाण्यावर

आता तर महिलांवर आधारित विषयांनाही लक्ष्य करण्यात आले आहे. १८ बंदी घातलेल्या विषयांपैकी सहा विषय थेट महिलांशी संबंधित आहेत, जसे की ‘जेंडर अँड डेव्हलपमेंट’, ‘द रोल ऑफ वुमेन इन कम्युनिकेशन’ आणि ‘विमेन्स सोशियोलॉजी’. तालिबान सरकारने दावा केला आहे की ते अफगाण संस्कृती आणि इस्लामिक कायद्यानुसार महिलांच्या अधिकारांचा आदर करतात.

‘शिक्षणात मोठी पोकळी निर्माण होईल’

बीबीसी अफगाणीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की एका समिती सदस्याने माहिती दिली आहे की, ‘महिलांनी लिहिलेली कुठलीही पुस्तके शिकवण्यास परवानगी नाही’. तालिबानची सत्ता येण्यापूर्वी उप न्यायमंत्री राहिलेल्या जाकिया अदेली यांचे पुस्तकही बंदी घातलेल्या यादीत आहे. त्या म्हणाल्या, ‘तालिबानने गेल्या चार वर्षांत जे काही केले आहे, ते पाहता अभ्यासक्रमात असे बदल अपेक्षितच होते’.

इराणी लेखकांनाही लक्ष्य

या बंदीमध्ये इराणी लेखक किंवा प्रकाशकांनी लिहिलेल्या पुस्तकांवरही लक्ष केंद्रित केले आहे. एका समिती सदस्याने सांगितले की, ‘अभ्यासक्रमात इराणी पुस्तकांचा शिरकाव रोखण्यासाठी’ हे पाऊल उचलण्यात आले आहे. ५० पानांच्या यादीत ६७९ पुस्तके आहेत, त्यापैकी ३१० पुस्तके इराणी लेखकांनी लिहिलेली आहेत किंवा इराणमध्ये प्रकाशित झाली आहेत.

एका प्राध्यापकाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, ‘इराणी लेखक आणि अनुवादकांची पुस्तके अफगाणिस्तानच्या विद्यापीठांना जागतिक शैक्षणिक समुदायाशी जोडणारा एक महत्त्वाचा दुवा आहेत. ती काढून टाकल्याने उच्च शिक्षणात मोठी पोकळी निर्माण होईल’.

काबुल विद्यापीठाच्या एका प्राध्यापकाने बीबीसीला सांगितले की, या परिस्थितीत त्यांना स्वतःच अभ्यासक्रम तयार करावा लागत आहेत, ज्यात तालिबानच्या नियमांचे पालन करावे लागते. पण असा अभ्यासक्रम जागतिक मानकांनुसार तयार होऊ शकत नाही.