
महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात ‘फिजिशियन’ या पदावर कार्यरत असलेल्या डॉ. विनायक पुरुषोत्तम पाटील यांनी कनिष्ठ निवासी डॉक्टरला जीवे मारण्याची धमकी दिली. रुग्णालयाच्या अधिष्ठाता यांच्यासह इतर डॉक्टरांना अत्यंत आच्यासह इतर वायराना अटाल यांची भोसरी रुग्णालयात बदली करण्यात आली आहे. तसेच त्यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिले आहेत.
एका रुग्णाला मेडिसिन विभागाचे डॉ. निरंजन पाठक यांच्या युनिटमध्ये दाखल केल्यानंतर उपचारांबद्दल माहिती न घेता हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसताना पाटील यांनी रुग्णालयातील पदव्युत्तर संस्थेचे कनिष्ठ निवासी डॉ. नीतेश पांडेगळे यांना ‘रुग्णाला बाहेरून औषधे आणायला का सांगितले?’ यावरून शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. मात्र, संबंधित रुग्णाने आपणास कोणत्याही डॉक्टरांनी बाहेरून औषधे आणण्यास सांगितले नसल्याचा जबाब लिहून दिला.
या प्रकरणानंतर डॉ. पांडेगळे यांनी वरिष्ठांकडे लेखी तक्रार केली. डॉ. पाटील यांच्याकडून खुलासा मागविण्यात आला. डॉ. पाटील यांनी खुलासा सादर केला. मात्र, त्यांनी अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे विभागप्रमुख डॉ. प्रवीण सोनी, डॉ. मारुती गायकवाड यांच्याविषयी अत्यंत असभ्य भाषा वापरली. अशा आक्रमक वर्तनाने सर्व डॉक्टरांमध्येच भीतीचे वातावरण निर्माण झाले. यामुळे महापालिका आयुक्त सिंह यांनी पाटील यांची विभागीय चौकशी करावी, असे आदेश दिले आहेत. पाटील यांची भोसरी रुग्णालयात बदली केली आहे. या आदेशाची नोंद त्यांच्या सेवा नोंद पुस्तकात करावी, असेही आदेशात आयुक्तांनी म्हटले आहे.
डॉ. पाटील यांच्यावर भाजप आमदारांचा वरदहस्त
डॉ. विनायक पाटील हे महापालिका नोकरीत असूनही भाजपच्या एका आमदारांचे व्हिडीओ, माहितीपत्रके वारंवार समाजमाध्यमांवर व्हायरल करत असतात. यातून आमदारांच्या जवळ असल्याचे दाखवण्याचा ते प्रयत्न करतात. आमदारांचा वरदहस्त असल्यामुळेच वायसीएम रुग्णालयातील निवासी डॉक्टरला जीवे मारण्याची धमकी व सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना असभ्य भाषा वापरण्यापर्यंत डॉ. पाटील यांची मजल गेल्याचे बोलले जात आहे.