
युद्ध हे ड्रोनने लढवले जाऊ शकत नाही. युद्धासाठी आपल्याकडे लांब रेंज आणि अत्याधुनिक लढाऊ विमाने असायला हवीत. या लढाऊ विमानातून लांबपर्यंत क्षेपणास्त्र डागता आले पाहिजे.
आज जगभरात ड्रोनचा वापर हा युद्धासाठी केला जात आहे. परंतु, युद्ध हे केवळ ड्रोनने जिंकले जाऊ शकत नाही, असे स्पष्ट मत हिंदुस्थानी वायुदलाचे चीफ एअर मार्शल ए. पी. सिंह यांनी व्यक्त केले. पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानविरोधात पुकारलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ वेळी ज्याचा वापर केला आहे ती एस-400 एअर डिफेन्स सिस्टम खऱया अर्थाने गेमचेंजर ठरली, असेही ते यावेळी म्हणाले.
आपल्या या लढाईत अनेक ड्रोनचा वापर करण्यात आला. दुसऱया शब्दांत सांगायचे झाले तर मी म्हणेन, ड्रोन चांगले आहेत. हे कोणत्याही सिस्टमसाठी चांगले आहे. खूप सारे ड्रोन एकाच वेळी आले तर तेही चांगले, परंतु जर आपल्याला युद्ध जिंकायचे असेल तर केवळ ड्रोनने युद्ध जिंकू शकत नाही. आपल्याकडे काही लांब पल्ल्याच्या, मोठय़ा क्षमतेची शस्त्रs असायला हवीत. काही लढाऊ विमाने ही अशी असायला हवीत ज्याने लांबपर्यंत हल्ला करता आला पाहिजे. त्यासाठी आम्हाला मानव आणि मानवरहित अशा दोन्ही सिस्टम हव्यात तरच युद्ध जिंकू शकू, असे ते म्हणाले. आम्ही लांब अंतरावरची एलआर-एसएएम, एस-400 खरेदी केली होती. ती पाकिस्तानविरोधात खऱया अर्थाने गेमचेंजर ठरली. याच्या दूरच्या रडार आणि मिसाईल सिस्टमने शत्रूंच्या विमानाला त्यांच्याच क्षेत्रात घुसून नुकसान पोहोचवले, असे एपी सिंह म्हणाले. आपल्या सिस्टमने अशी काही कामगिरी केली की, पाकिस्तानला त्यांच्यात क्षेत्रात काम करता आले नाही. एस-400 ची रेंज ही विरोधकांच्या शस्त्रांच्या रेंजपेक्षा कित्येक पट अधिक होती. त्यामुळे त्यांचे विमान आपल्या सीमेपर्यंत येऊ शकले नाही. जे आले त्यांचे नुकसान झाले. यालाच गेमचेंजर म्हणतात, असे ते म्हणाले.