टॅरिफ वॉरनंतर ट्रम्प यांचा व्हिसा बॉम्ब! एच-1 बीसाठी मोजावे लागणार तब्बल 88 लाख रुपये; ‘अमेरिकन ड्रीम’ला झटका

‘टॅरिफ वॉर’नंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगावर व्हिसा बॉम्ब टाकला आहे. ट्रम्प यांनी अमेरिकेच्या एच-1 बी व्हिसा शुल्कात मोठी वाढ केली आहे. यापुढे हा व्हिसा मिळवण्यासाठी 1 लाख डॉलर म्हणजे तब्बल 88 लाख रुपये मोजावे लागणार आहेत. ट्रम्प यांनी आज या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. या निर्णयाचा सर्वात मोठा फटका तंत्रज्ञान क्षेत्राला व पर्यायाने या क्षेत्रात सर्वाधिक संख्येने असणाऱ्या हिंदुस्थानी तरुणांना बसणार आहे. लाखो हिंदुस्थानींचे ‘अमेरिका ड्रीम’ उद्ध्वस्त होणार आहे.

एच-1 बी व्हिसासाठी आतापर्यंत एक ते सहा लाख रुपये इतके शुल्क आकारले जात होते. हे शुल्क बाहेरच्या देशातील कर्मचाऱयांना अमेरिकेत बोलावणारी कंपनी तिथल्या सरकारला भरत असे. हे शुल्क परवडणारे होते. त्यामुळे कंपन्यांना बाहेरच्या देशांतून स्वस्तात कर्मचारी मिळवणे सोपे होते. मात्र ट्रम्प यांनी दुसऱयांदा सत्तेत आल्यापासून ‘अमेरिका फर्स्ट’ धोरण कठोरपणे राबवायला सुरुवात केली आहे. अमेरिकेत होणारे मनुष्यबळाचे स्थलांतर आटोक्यात आणून स्थानिक तरुणांना रोजगार मिळवून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. यातूनच ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला आहे.

‘अमेरिकेत बाहेरून कर्मचारी येण्यास आमचा विरोध नाही. पण ते कर्मचारी अत्युच्च दर्जाचे काwशल्य असलेले हवेत. अमेरिकेत ज्यांना पर्याय उपलब्ध नाही असेच लोक आम्हाला हवे आहेत. नव्या निर्णयामुळे आमच्या कंपन्या आता सरसकट भरती करणार नाहीत, असे ट्रम्प यांचे मत आहे.