बॉलीवूड पार्कमध्ये पैसे चोरणारे अटकेत

गोरेगाव येथील बॉलीवूड पार्कमधील कॅश काउंटरमधून 4.11 लाख रुपये चोरी करणाऱ्या तिघांना दिंडोशी पोलिसांनी अटक केली. हुसेन मंजूर अहमद भट, शुभम पांडे आणि अभिषेक पारधे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्या तिघांना अटक करून न्यायालयात हजर केले होते. गोरेगाव येथे बॉलिवूड फिल्म सिटी आहे. फिल्म सिटीच्या गेट क्रमांक 1 येथे तिकीट काउंटर आहे. प्रेक्षकांना तिकीट देऊन आत प्रवेश दिला जातो. काउंटरवर गोळा झालेली रक्कम मुख्य कार्यालयात जमा केली जाते.

गेल्या महिन्यात कर्मचाऱ्याने कार्यालय बंद केले. त्यानंतर दिवसभराचे 4.90 लाख रुपये एका बॅगेत ठेवले. पैशाची बॅग कपाटात ठेवली. दुसऱ्या दिवशी कर्मचारी कामावर आला. तेव्हा त्याला कपाटातील रक्कम गायब झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणी त्याने दिंडोशी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला.

वरिष्ठ निरीक्षक महेंद्र शिंदे यांच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक अजित देसाई यांच्या पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन अटक केली. पोलिसांनी गुह्यात वापरलेली एक मोटरसायकल आणि 2 लाख 35 हजार रुपये जप्त केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भट हा त्या टुरिस्ट बसमध्ये कामाला होता. मात्र त्याला कामावरून काढून टाकले होते. त्यानंतर भटने पांडे आणि पारधेच्या मदतीने चोरीचा कट रचला.