
हिंदुस्थानचा प्रमुख यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत आगामी वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला मुकणार आहे. ही मालिका 2 ऑक्टोबरपासून अहमदाबाद येथे सुरू होणार आहे. हिंदुस्थानच्या निवड समितीची बैठक ही 24 सप्टेंबरला होणार असून अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील समिती या मालिकेसाठी 15 जणांचा संघ जाहीर करेल. ही संख्या गेल्या वर्षी न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेपेक्षा दोन खेळाडूंनी कमी असेल.
पंत यंदाच्या इंग्लंड दौऱ्यावर अॅण्डरसन-तेंडुलकर
ट्रॉफीत उपकर्णधार होता. परंतु मँचेस्टर कसोटीत त्याच्या डाव्या पायाला फ्रॅक्चर झाले. पहिल्या डावात तो लंगडत मैदानात उतरला, पण शेवटच्या कसोटीसाठी त्याची जागा एन. जगदीशनने घेतली. सध्या तो बंगळुरूतील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये फिटनेसवर लक्ष केंद्रित करत आहे. वैद्यकीय तज्ञांच्या परवानगीनंतरच तो पुन्हा फलंदाजी व यष्टिरक्षण सुरू करू शकणार असल्याचे कळले आहे. त्याच्या पुनरागमनाबाबत अनिश्चितता असल्यामुळे वेस्ट इंडिज मालिकेनंतर तो असेल की नाही, याबाबत कसलीही कल्पना नाही. 19 ऑक्टोबरपासून हिंदुस्थानची ऑस्ट्रेलियाविरुद्ध मर्यादित षटकांची मालिका सुरू होत असून यातही पंतला विश्रांतीच मिळण्याची दाट शक्यता आहे. पंतच्या अनुपस्थितीत ध्रुव जुरेल हा हिंदुस्थानचा प्रमुख यष्टिरक्षक असेल.