
मुंबई महापालिकेच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांपासून ते निम्नस्तरीय कामगारांपर्यंत काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षी देण्यात आलेल्या रकमेपेक्षा 25 टक्के अधिक रक्कम बोनस म्हणून देण्यात यावी, अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने पालिका आयुक्तांकडे केली आहे.
बृहन्मुंबई महापालिकेत कायमस्वरूपी विविध प्रवर्गातील कार्यरत कर्मचारी, अधिकारी, तंत्रज्ञ, परिचारिका तसेच पालिकेच्या विविध खात्यांत सेवा देणाऱ्या कंत्राटी कामगार, कर्मचाऱ्यांना दरवर्षी दिवाळीनिमित्त बोनस दिला जातो. या वर्षीसुद्धा पालिकेकडून बोनसची तरतूद करण्यात आली आहे. मात्र गतवर्षीपेक्षा 25 टक्के अधिक रक्कम बोनस म्हणून देण्यात यावी, अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांनी केली आहे.
कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही जादा रक्कम द्या
दिवाळीपूर्वी कंत्राटी म्हणून काम करणारे रोजंदारी कामगार, बहुउद्देशीय कामगार, आरोग्य खात्यातील कंत्राटी कर्मचारी, मुंबई जिल्हा एड्स कंट्रोल सोसायटी कर्मचारी, एनयूएचएमअंतर्गत डी.एस. एंटरप्रायझेसमधील कर्मचारी, क्षयरोग नियंत्रण अभियानअंतर्गत कार्यरत कर्मचारी, बालवाडी शिक्षिका, मदतनीस, सर्व समग्र शिक्षा अभियान कर्मचारी तसेच स्वयंसेवी आरोग्यसेविका व प्लाझ्मा सेंटर या कर्मचाऱ्यांनासुद्धा जादा रक्कम बोनस म्हणून द्या, अशीही मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.