
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या चर्चेत आहेत. त्यांनी लादलेल्या टॅरिफचा परिणाम जगभरात दिसून येत आहे. तसेच नुकत्याच झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेला संबोधित करताना त्यांनी हिंदुस्थान पाकिस्तानचे युद्ध थांबवल्याचा पुनर्रुच्चार केला. तसेच सात महिन्यांच्या कालावधीत मी सात युद्धे थांबवली आहेत, असेही ते म्हणाले. यातून नोबेल पुरस्कार मिळवण्यासाठी त्यांची धडपड सुरू असल्याचे दिसून येते. आता फ्रन्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी ट्रम्प यांना हव्या असलेल्या नोबेल पुरस्काराबाबत महत्त्वाचे मत व्यक्त केले आहे.
फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन म्हणाले की, जर डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार जिंकायचा असेल तर त्यांनी गाझामधील युद्ध थांबवावे. अमेरिका हा एकमेव देश आहे ज्याकडे इस्रायलवर दबाव आणण्याची शक्ती आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. न्यू यॉर्कमधील फ्रान्सच्या BFM टीव्हीशी बोलताना मॅक्रॉन यांनी हे मत व्यक्त केले. अमेरिका इस्रायलला शस्त्रे आणि युद्ध उपकरणे पुरवते,त्यामुळे अमेरिकाच हे युद्ध थांबवू शकते, असेही ते म्हणाले.
या युद्धाबाबत काहीतरी करू शकणारी एक व्यक्ती म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प. अमेरिकेकडे युद्ध थाबवण्याची क्षमता आहे कारण ते इस्रायलला युद्धासाठी लागणारी शस्त्रे पुरवत आहेत. मॅक्रॉन यांनी स्पष्टपणे सांगितले की जर ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार जिंकायचा असेल तर त्यांनी गाझामधील युद्ध थांबवण्यासाठी इस्रायलवर दबाव आणला पाहिजे. त्यांनी गाझामध्ये सुरू असलेल्या युद्धासाठी थेट अमेरिकेला जबाबदार धरले आहे.
सध्या १९३ संयुक्त राष्ट्रांच्या सदस्यांपैकी १५७ देशांनी पॅलेस्टाईन राज्याला एक सार्वभौम राष्ट्र म्हणून मान्यता दिली आहे. ते आंतरराष्ट्रीय समुदायाचे ८१ टक्के प्रतिनिधित्व करतात. शिवाय, कॅथोलिक चर्चशी संलग्न असलेल्या होली सी आणि संयुक्त राष्ट्रांमध्ये गैर-सदस्य निरीक्षक दर्जा असलेल्या व्हॅटिकन सिटीनेही त्याला मान्यता दिली आहे. पॅलेस्टाईनला मान्यता दिल्याने जागतिक स्तरावर देशाचे स्थान मजबूत होते. इस्रायली अधिकाऱ्यांना त्यांच्या कब्जासाठी जबाबदार धरण्याची आणि पाश्चात्य शक्तींना दोन-राज्य उपायांसाठी काम करण्यासाठी दबाव आणण्याची त्याची क्षमता वाढणार आहे.