धाराशीवमध्ये शिंदेंना घेराव, शेतकऱ्यांनी मदत नाकारली

मराठवाडय़ात अतिवृष्टीमुळे पूरग्रस्त झालेल्या लोकांच्या मदतवाटपातही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतःचा प्रचार करत असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. धाराशीवमध्ये नुकसानग्रस्तांना दिलेल्या मदत कीटवर शिंदे आणि प्रताप सरनाईक यांचे फोटो पाहून गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला. शेतकऱ्यांनी शिंदे यांना घेराव घातला आणि कीट घेऊन आलेला टेम्पो परत पाठवला.

आज एकनाथ शिंदे आणि मंत्री प्रताप सरनाईकही मदतीचे कीट घेऊन मराठवाडय़ातील धाराशीवमधील परंडा तालुक्यातील करंजा येथे पोहोचले. पण त्या पिशव्यांवर शिंदे, सरनाईकांचे फोटो आणि गटाचे चिन्ह पाहून गावकरी संतापले. सरकारी मदत द्यायची सोडून स्वतःचा प्रचार करता असा संताप व्यक्त करत गावकऱयांनी मदतीचा टेम्पो परत घेऊन जायला सांगितले. गेल्या तीन दिवसांपासून आमचा संसार पाण्यात गेला आहे, तीन दिवस कुठे होता असा सवाल करत, तुमचा टेम्पो परत घेऊन जा, असे गावकऱयांनी शिंदे यांना सांगितले. फोटो कशाला बघता, मदत घ्या असे शिंदेंनी सांगूनही गावकऱयांनी त्यांची मदत स्वीकारली नाही.

दाढीचे फोटो टाकून मदत करताय, हा निर्लज्जपणा – संजय राऊत

शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी यावरून एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. लोक मरत असताना आणि आक्रोश करत असताना अशा प्रकारे पिशव्यांवर दाढीचे आणि चेहऱयाचे फोटो लावून प्रचाराचे राजकारण करणे हा निर्लज्जपणा आणि अमानुषपणा आहे, अशी टीका त्यांनी केली. शिंदे यांच्याकडे एवढा पैसा असेल तर त्यांनी सरकारी मदतीवर स्वतःचे फोटो लावण्याऐवजी, नगरविकास खात्याने समृद्धी, शक्तिपीठ महामार्गात ठेकेदारांकडून लुटलेले पैसे स्वतःच्या तिजोरीतून काढून शेतकऱयांना मदत करावी, असे आव्हानही त्यांनी दिले.