उद्धव ठाकरे आज मराठवाड्यात, पूरग्रस्त भागाची पाहणी करणार

अतिवृष्टीमुळे मराठवाडय़ातील शेतकरी आणि ग्रामस्थांचे अतोनात नुकसान झाले आहे. तयार पिके उद्ध्वस्त झाल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने संसार वाहून गेले आहेत. पूरग्रस्तांना धीर देण्यासाठी आणि त्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या मराठवाडा दौऱ्यावर जाणार आहेत. शेतकऱयांच्या बांधावर जाऊन ते नुकसानीची पाहणी करणार आहेत.

उद्धव ठाकरे उद्या सकाळी साडेअकरा वाजता लातूरमधील काडगाव येथे जाऊन अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. तेथून दुपारी साडेबारा वाजता धाराशीवच्या कळंब तालुक्यातील इटकूर गावात तर दुपारी दीड वाजता वाशी तालुक्यातील पारगावात उद्धव ठाकरे यांचा पाहणी दौरा नियोजित आहे.

बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिह्यातही उद्धव ठाकरे जाणार आहेत. बीडमधील कुर्ला येथे दुपारी दीड वाजता, जालनाच्या अंबड तालुक्यातील महाकाळा येथे साडेचार वाजता तर सायंकाळी साडेपाच वाजता छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील रजापूर गावात जाऊन उद्धव ठाकरे पाहणी करणार आहेत.