द्रुतगतीमुळे अहिल्यानगरचा रेल्वे प्रवास झाला सुपरफास्ट! वांबोरी ते राहुरी रेल्वे चाचणी यशस्वी, ताशी 125 कि.मी. वेगाने धावली रेल्वे

अहिल्यानगर ते मनमाड डबल लाइन रेल्वेमार्ग प्रकल्पाअंतर्गत वांबोरी ते राहुरी या 13.21 कि.मी. अंतराची चाचणी बुधवारी घेण्यात आली. येत्या काही कालावधीमध्ये नगर ते मनमाडपर्यंतचे हे काम पूर्ण होणार असून, यामुळे अहिल्यानगरचा रेल्वे प्रवास सुपरफास्ट होणार आहे. या पूर्ण मार्गात इलेक्ट्रिक इंजिनचा वापर होत आहे.

गेल्या तीन वर्षांपासून अहिल्यानगर ते मनमाड द्रुतगती (डबल लाइन) रेल्वेमार्गाचे काम सुरू आहे. यापूर्वी कोपरगाव ते येवला व येवला ते अंकाई, अंकाई ते अंकाई किल्ला, अंकाई किल्ला ते मनमाड, कोपरगाव ते कान्हेगाव, बेलापूर ते पुणतांबा, बेलापूर ते पढेगाव, निंबळक ते वांबोरी, पुणतांबा ते कान्हेगाव, पढेगाव ते राहुरी या मार्गांची यशस्वी चाचणी घेण्यात आली. आज 13.21 कि.मी. डबल लाइन रेल्वेमार्गाची चाचणी घेण्यात आली. आता ऐकूण 147 कि.मी. अंतराची चाचणी पूर्ण घेतल्याची माहिती उपमुख्य अभियंता सागर चौधरी यांनी दिली आहे.

मनमाड ते दौंड रेल्वेमार्गात अहिल्यानगरच्या रेल्वे स्थानकाचा महत्त्वपूर्ण टप्पा येतो. मात्र, हा मार्ग सिंगल लाइन असल्यामुळे रेल्वेगाडीचा वेग कमी होता. तसेच सिंगल लाइनमुळे अनेकदा रेल्वेगाडय़ांना थांबा घ्यावा लागत होता. तासन्तास रेल्वेगाडी एकाच जागेवर थांबून ठेवावी लागत. मात्र, आता हा पूर्ण मार्ग इलेक्ट्रिक इंजिनचा वापर करून डबल लाइन करण्यात येत असल्यामुळे विनाकारण रेल्वेगाडय़ांचा थांबा आता बंद होणार आहे. या द्रुतगती रेल्वेमार्गावर मुळा नदीवरील लांबी 200 मीटर व उंची 21मीटर असलेले सर्वांत मोठा पूल बांधण्यात आला आहे.

या पुलावरून नागरिकांच्या सुरक्षेसाठी ओपन वेब गल्डर लावण्यात आला आहे. अहिल्यानगर ते मनमाड या लोहमार्गामधील पहिल्यांदाच वापर करण्यात आलेला आहे. तसेच हा रेल्वे पूल बनविण्यासाठी दीड वर्षाचा कालावधी लागला असून, नगर ते मनमाड रेल्वे द्रुतगती मार्गामधील सर्वांत मोठय़ा लांबीचा व उंचीचा दुसरा पूल असून, या पुलामुळे नगर-मनमाड रेल्वेगाडय़ा धावण्यासाठी बळकटी मिळाली आहे. तसेच या कामामुळे रेल्वे ताशी 125 प्रतिकि.मी. वेगाने धावणार असल्याने रेल्वेगाडी धावण्याचा वेगही सुपरफास्ट होणार तीन वर्षांपासून हे काम सुरू आहे. अहिल्यानगर ते मनमाडपर्यंतचा टप्पा पूर्ण होण्यास अजून काही कालावधी लागणार आहे.

यावेळी रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा, ए. के. पांडे, बी. के. सिंह, सागर चौधरी, राजनारायण सैनी, धर्मेंद्र कुमार, एस. के. सिंह, सुद्धांसू कुमार, आर. डी. सिंह, प्रगती पटेल, राकेश कुमार, परशुराम राठोड, धम्मरत्न संसारे आदी उपस्थित होते.