
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अतिवृष्टी आणि पूरग्रस्त मराठवड्याच्या दौऱ्यावर आहेत. गुरुवारी त्यांनी धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यात येणाऱ्या इटपूर या अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. मराठवाड्यावर मोठी आपत्ती आली असून अशावेळी सरकारने खंबीर असायला पाहिजे. दरवेळी मुख्यमंत्री सांगतात वेळ आल्यावर अमूक करू… तमूक करू… आता शेतकऱ्यांना मदत करण्यासाठीही पंचांग पाहणार आहात का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी सरकारला केला. तसेच शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी केली. यावेळी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, खासदार ओमराजे निंबाळकर, शिवसेना नेते अंबादास दानवे, आमदार मिलिंद नार्वेकर, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी उपस्थित होते.
शेतकऱ्यांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्री दरवेळी सांगतात योग्य वेळ आल्यावर अमूक करू… तमूक करू… आता शेतकऱ्यांना मदत करण्यासाठीही पंचांग पाहणार आहात का? ज्या प्रमाणे आम्ही सातबारा कोरा केला, त्याप्रमाणे आता हीच वेळ आहे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची आणि कर्जमुक्त करण्याची. ही आमची पहिली मागणी आहे.
कर्जमाफीची मागणी लावून धरणार, सरकारकडून कामे करून घेणार; उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिला धीर
सर्व शेतकऱ्यांची हेक्टरी 50 हजार रुपये मिळायला हवेत अशी एकमुखी मागणी आहे. कारण फक्त शेतीतील पिकांचे नुकसान झाले नाही तर शेतीची जमीनच वाहून गेली आहे. पुन्हा शेती उभी करायला तीन ते पाच वर्ष लागणार आहेत. आज सरकारने सव्वा दोन ते अडीच हजार कोटींची मदत जाहीर केली. पण संपूर्ण मराठवाडा धरला तरी हेक्टरी फक्त साडे आठ हजार रुपये मिळतील. पण शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. उभी पिकं सडून गेली आहेत. त्याची साफसफाई करण्याचा खर्च, जमिनीची वाताहात झालीय ती निटनेटकी करण्याचा खर्च मोठा आहे. माझा शेतकरी पुन्हा कसा उभा राहणार? म्हणून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.
सरकारने पिकविम्याचे निकष बदलला आहेत. पण पिकविम्याची रक्कम आताच मिळाली पाहिजे. आता मिळणार नसेल तर शेतकऱ्यांनी पिकविमा करायचा कशाला? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. तसेच तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही, असे म्हणत त्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना हात तोडून कृपया चुकीचे पाऊल उचलू नका, अशी विनंतीही केली.
तुमचे आयुष्य वाहून गेले, पण आम्ही तुमच्या सोबत आहेत. कृपा करून वेडे वाकडे पाऊल उचलू नका. हे वाईट दिवसही जातील. सरकारने मदत जाहीर केलीय, पण त्या पलीकडे जाऊन मदत केली पाहिजे. मदत देताना वेडे वाकडे निकष लावले गेले आणि सरकारी अधिकारी आडमुठाने वागले तर त्यांना सरळ सुद्धा करण्याची हिंमत दाखवावी लागेल. शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे मिळवून द्यावे लागेल, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
पुरामुळे खचून जाऊ नका, आत्महत्येचा विचार मनात आणू नका.
धाराशीव येथे पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेबांनी शेतकरी बांधवांशी संवाद साधला. pic.twitter.com/DsCdB4jao7— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) September 25, 2025