
हिंदुस्थानची रेल्वे सेवा ही अनेकदा विनोदाचा विषय बनत असते. मात्र सध्या सोशल मीडियावर रेल्वे सेवा आणि तिची सुरक्षितता हा विषय मोठय़ा प्रमाणावर चर्चेला आला आहे. या चर्चेसाठी दोन घटना कारणीभूत ठरलेल्या आहेत. एका घटनेत वंदे भारतसारख्या महागडय़ा रेल्वेत एक्सपायरी डेट (तारीख) उलटून गेलेले अन्न देण्यात आले, तर दुसऱ्या घटनेत चालू रेल्वेत एक मनुष्य हातात जिवंत साप घेऊन लोकांकडून पैसे मागताना पॅमेऱ्यात पैद झाला आहे. या दोन्ही घटना समाज माध्यमावर आल्यानंतर रेल्वेला प्रवाशांची खरंच काळजी आहे का? असा प्रश्न मोठय़ा प्रमाणावर उपस्थित होत आहे.
गोरखपूर ते पाटलीपुत्र, पाटणापर्यंत धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनमध्ये प्रवाशाने जेवणाची ऑर्डर केली. त्याला देण्यात आलेल्या जेवणाचे पॅकेट आणि त्या पॅकेटबरोबर आलेले केचप या दोन्हीवरची एक्सपायरी डेट उलटून गेलेली होती. संतप्त प्रवाशाने मग पँट्रीमध्ये जाऊन मोठा वाद घातला आणि सदर प्रकरणाचा जाब विचारला. काही वेळातच पोलीस आणि टीटीईदेखील तिथे पोहोचले. प्रवाशाने त्यांना सांगितले की, हा काही एक-दोन दिवसांचा प्रश्न नाही, तर चक्क दोन वर्षे उलटून गेलेले अन्न त्याला देण्यात आलेले आहे. प्रवाशाने घडलेला सर्व प्रकार सोशल मीडियावर टाकल्यानंतर रेल्वेने अखेर त्याची दखल घेत दिलगिरी व्यक्त केली आहे आणि संबंधित केटररवर कारवाई करण्यात आल्याचे तसेच यापुढे योग्य ती काळजी घेण्याचे निर्देश दिल्याचे कळवले आहे. दुसरीकडे अहमदाबाद-साबरमती एक्स्प्रेसमध्ये एक माणूस हातात जिवंत साप घेऊन गाडीत फिरत होता. काही लोक भक्तिभावाने त्याला पैसेदेखील देत होते. ही घटना समाज माध्यमावर येताच लोकांनी प्रचंड संताप व्यक्त केला. रेल्वेचा हा निष्काळजीपणा म्हणजे प्रवाशांच्या जिवाशी खेळ असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. हा साप जर एखाद्याला चावला असता तर काय? अशी भीतीदेखील अनेकांनी व्यक्त केली. सदर व्यक्तीला तातडीने अटक करण्याची मागणी लोकांनी रेल्वेकडे केली आहे.