
बदली नको असलेल्या शिक्षकांना उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. या शिक्षकांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांच्याकडे अर्ज करावा. या अर्जावर सीईओंनी योग्य तो निर्णय घ्यावा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
सप्टेंबर महिन्यात राज्यभरातील लाखो शिक्षकांचे बदली आदेश जारी करण्यात आले. याविरोधात शेकडो शिक्षकांनी अॅड. सुरेश पाकळे व अॅड. नीलेश देसाई यांच्यामार्फत याचिका दाखल केल्या. न्या. रवींद्र घुगे व न्या. अश्विन भोबे यांच्या खंडपीठासमोर या याचिकांवर सुनावणी झाली.
अनेक शिक्षकांना बदली नको. काही शिक्षकांनी बदली मान्य केली आहे. तर काही शिक्षक तटस्थ आहेत, असा मुद्दा न्यायालयात उपस्थित करण्यात आला. त्याची नोंद करून घेत खंडपीठाने हे आदेश दिले. प्रत्येक अर्जानुसार सीईओंनी 30 दिवसांत निर्णय घ्यावा, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले. मुळात शैक्षणिक वर्ष सुरू असताना शिक्षकांच्या बदल्या करणे अयोग्यच आहे, असे न्यायालयाने प्रशासनाला फटकारले.
शिक्षकांच्या अर्जावर अंतिम निर्णय होईपर्यंत त्यांची बदली स्थगित राहील, असे न्यायालयाने बजावले आहे.
अपिलाची मुभा
सीईओंनी घेतलेला निर्णय मान्य नसल्यास शिक्षक विभागीय आयुक्तांकडे दाद मागू शकतात. विभागीय आयुक्तांनी 30 दिवसांत अपीलावर निर्णय घ्यावा, अशी तरतूद बदली आदेशात करण्यात आली आहे. त्यानुसार शिक्षक अपील करू शकतात, असे न्यायालयाने स्पष्ट केले.