श्री तुळजाभवानी देवीची भवानी तलवार अलंकार महापूजा; दर्शनासाठी भाविकांची गर्दी

शारदीय नवरात्र महोत्सवात सोमवारी आठव्या माळेच्या दिवशी श्री तुळजाभवानी देवीची भवानी तलवार अलंकार महापूजा मोठ्या भक्तिभावाने मांडण्यात आली. सकाळपासूनच मंदिर परिसरात भाविकांची गर्दी होती. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य रक्षणासाठी श्री तुळजाभवानी देवींने प्रसन्न होऊन स्वतःच्या हाताने भवानी तलवार दिली. त्या तलवारीच्या आर्शीर्वादाने स्वराज्याची स्थापना शक्य झाली, अशी लोकधारणा आहे. हाच परंपरेचा वारसा जपण्यासाठी दरवर्षी नवरात्रोत्सवात भवानी तलवार अलंकार महापूजा मोठ्या श्रद्धेने मांडली जाते.

भवानी तलवार पूजेमुळे मंदिर परिसरात दिवसभर भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. रविवारी रात्री श्री देवीजींची अश्वारूढ छबिना मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली. या मिरवणुकीत जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष किर्ती किरण पुजार हे सपत्नीक सहभागी झाले होते. पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि “जय भवानी” च्या घोषणांनी मंदिर परिसर दुमदुमून गेला होता.

शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने मंदिर परिसर आकर्षक रोषणाईने सजविण्यात आला असून सांस्कृतिक कार्यक्रमांनाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. भाविकांच्या गर्दीमुळे तुळजापूर शहर भक्तिभाव व उत्साहाने उजळून निघाले आहे.