
राज्यात गंभीर संकट असतानाही सरकार आपल्याच मस्तीत आहे. निवडणुका असलेल्या राज्यात भाजपकडून जनतेच्या पैशांची उधळपट्टी करण्यात येत आहे. मात्र, राज्यातील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचत नाही. सरकारकडून फक्त घोषणांचा पूर आला आहे, प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंत काहीही मदत पोहचलेली नाही, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी सरकारवर हल्ला चढवला आहे.
कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी योग्य नियोजन करूनच ते हाती घेतले पाहिजे. सायन ब्रिज, टिळक पूल यांचे काम सुरू आहे, अजून ते पूर्ण झालेले नाही. ईस्ट-वेस्ट सर्व गोंधळ उडाला आहे. आम्ही मार्चमध्ये त्यांना विनंती केली होती, ती त्यांनी मान्य केली. मात्र, आता नवरात्रोत्सव सुरू आहे. दिवाळी तोंडावर आली आहे. याचा विचार करून काम हाती घ्यावे, असे आम्ही सांगत होतो. मात्र, एमएमआडीए आपल्याच घाईत आहे, असे ते म्हणाले.
रेल्वेचे काम आपण पाहतोय, तेही संथ गतीने सुरू आहे. डिलाईल रोडच्या कामाला एवढा विलंब झाला होता की त्याचे नाव आम्ही डिले रोड ठेवले होते. मेट्रो 2 चे कामही अनेक काळ प्रलंबित होते. ते आता सुरू झाले आहे. अशी नियोजन्यशून्य कामे वरळीत होऊ नये, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहे. या ठिकाणी महापालिकेसोबत आमचा चांगला समन्वय आहे, असे त्यांनी सांगितले.
ज्या राज्याच निवडणुका आहेत, सध्या बिहारच्या निवडणुका जवळ आल्यात. तिथे त्यांनी 10 हजार रुपये प्रती महिलेला देण्याची घोषणा केली आहे. तिथे पैसा जातोय, याची पोटदुखी नाही. मात्र, ज्या राज्यात निवडणुका नाहीत म्हणजे महाराष्ट्र आम्ही जास्तीतजास्त जीएसटी देतो. महाराष्ट्रातून देशाला मिळणार महसूल सर्वात जास्त आहे. असे असून राज्याला काय मदत जाहीर झाली आहे. आम्ही जी मदत मागत आहोत, ती आमच्या हक्काची मदत आहे. प्रती हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई आणि कर्जमुक्तीची आमची मागणी आहे. मात्र, सरकारकडून फक्त घोषणांचा पूर येत आहे. मात्र, प्रत्यक्षात काहीही मदत पोहचत नाही. ब्रँडिंग, सीएसआर किंवा जनतेकडून मदत सुरू राहील, पण सरकारकडून जी ठोस मदत व्हायला पाहिजे, ती होत नाही. महत्त्वाचे म्हणजे ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज आहे. कर्जमुक्तीची घोषणा करत मदत योग्य प्रकारे वितरीत करा, 50 हजार हेक्टरी मदत जाहीर करा, हे अजूनही होताना दिसत नाही, हे दुर्दैव आहे. आज कदाचित महाराष्ट्रातील निवडणुका जवळ असत्या, तर पैशांचा पूर आला असता. मात्र, महाराष्ट्रात निवडणुका नसल्याने शेतकऱ्यांचा आवाज सरकारला ऐकू येत नाही. त्यामुळे सरकार आपल्याच मस्तीत आहे, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.
पीएम केअरचा पैसा कुठे गेला, हा सवाल आम्ही सातत्याने करत आहोत. या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीच्या संकटात पीएम केअर फंडचा पैसा वापरावा, ते जर पीएम केअरचा पैसा वितरीत करत असतील तर त्यांच्यावतीने आम्ही जनतेला मदत करू, त्यांचे होर्डिंग्ज आणि फोटो वापरू, असेही आदित्य ठाकरे म्हणाले. मात्र, ते पीएम केअरचा पैसा वापरत नाहीत. मुखअयमंत्री फक्त आश्वासन देऊन आले आहेत. त्यांनी फक्त घोषणा केली आहे. पण मदत अद्यापही वितरीत झालेली नाही. तसेच गेल्या अडीच वर्षातले 15 हजार कोटी थकीत आहेत. ही शेतकऱ्यांच्या मदतीची थकबाकी आहे. हे जनतेचे पैसे आहेत. त्याची तुम्ही इतर राज्यात निवडणुका असल्याने तिथे उधळपट्टी करता. 11 वर्षात केंद्रात सत्ता आहे, बिहारमध्ये वर्षानुवर्षे भाजपची सत्ता असून आता ते मते विकत घेण्यासाठी पैशांची उधळपट्टी करत असतील जर जनेतेने काय करायचे, असा संतप्त सवालही त्यांनी केला.
केंद्रात 11 वर्षे सत्ता आहे, राज्यात त्यांची 9 वर्षे आहेत, तरीही शासन, प्रशासन याबाबत त्यांनी काहीही केले नाही, सांगण्यासारखे कोणतेही काम त्यांनी केले नाही. त्याचे दररोज नवनवीन भ्रष्टाचार उघड होत आहेत. त्यामुळे हिंदू-मुस्लीम करण्याशिवाय त्यांच्याकडे पैसा नसतो. जाती धर्माच्या नावावर ते निवडणुका लढवत असतात. काम केलेय, जनतेला त्यांनी 11 वर्षात काय दिलेय, अच्छे दिन नेमके कधी येणार? असा सवालही त्यांनी केला.