प्रासंगिक – वृद्धाश्रम : गरज की पळवाट?

दोन पिढय़ांतील अंतरामुळे तसेच सामंजस्याच्या अभावाने तरुणांचे व वृद्ध व्यक्तींचे आजकाल मतभेद होऊ लागले आहेत. ज्या वृद्ध जोडप्यांना दोन अथवा अधिक मुले असतील त्यांच्यामध्ये संपत्तीच्या वाटणीबरोबर आई-वडिलांचीसुद्धा वाटणी होऊ लागली. एका मुलाकडे आई तर दुसऱयाकडे वडील राहू लागले. ज्या वयात वृद्ध दाम्पत्याला एकमेकांच्या सहवासाची आणि आधाराची आवश्यकता असते त्या वयात एकमेकांची ताटातूट होऊ लागली अथवा दोघांची रवानगी वृद्धाश्रमात होऊ लागली.

खरं म्हणजे वृद्ध व्यक्तींना सांभाळणे अशक्य नाही. वृद्ध व्यक्तींनी व तरुणांनी समजूतदारपणा दाखवला तर दोघांनाही एकमेकांचा आधार होईल. हल्ली तरुण जोडपी नोकरीनिमित्त बाहेर जातात व मुलांना पाळणाघरात ठेवतात याऐवजी मुले आजी-आजोबा यांच्या सहवासात आपल्या घरात राहिली तर मुलांवर चांगले संस्कार होतील व त्यांना आजी-आजोबा यांच्याबद्दल प्रेम वाटेल.

नीट विचार केला तर वृद्धाश्रम ही समाजाची गरज नाही तर वृद्ध माणसांची जबाबदारी टाळण्यासाठी काढलेली पळवाट आहे, असेच चित्र दिसते. ज्या तरुणांना वृद्ध डोईजड होतात त्यांनी स्वतः सुद्धा कधीतरी वृद्ध होणार आहोत याचा विचार करावा. आपल्या आई-वडिलांनी कष्ट करून आपल्याला लहानाचे मोठे केले याची जाण ठेवावी. म्हातारपण आणि लहानपण सारखेच असते असे म्हटले जाते. मग जर का आपल्या लहान मुलांनी हट्ट केला अथवा मनासारखी वागली नाहीत तर आपण त्यांना अनाथाश्रमात पाठवणार आहोत का? याचा विचार करावा. गाय दूध द्यायची बंद झाली म्हणून तिला वाऱयावर सोडणे अथवा कसायाला देणे ज्याप्रमाणे अव्यवहार्य आहे, त्याचप्रमाणे वृद्ध व्यक्तींना वृद्धाश्रमात पाठवणे अयोग्य आहे.

दोन पिढय़ांतील संघर्ष टाळण्यासाठी दोघांनीही समजूतदारपणा दाखवला पाहिजे. विशेषतः वृद्ध व्यक्तींना आपले जीवनसंगीत खुलवायचे असेल तर सा – रे – ग – म – प – ध – नी – सा या सप्तस्वरांच्या आधारे खुलवता येईल. हे सप्तस्वर म्हणजेच सात सद्गुण.

‘सा’ – सावधानता ः वृद्ध व्यक्तींनी जीवनाबद्दल सावध असले पाहिजे. आपला विचार, आपला उच्चार, आपली वागण्याची पद्धत याबाबतीत त्यांनी सावध असले पाहिजे. घरात सारखी चिडचिड करणे, त्रागा करणे, आपल्या मनासारखेच झाले पाहिजे, असा हेकटपणा करणे इत्यादी गोष्टी टाळल्या पाहिजेत.

‘रे’ – रेखीवपणा ः आपले कपडे, आपले सामान जागच्या जागी ठेवणे, स्वतःची कामे स्वतःच करणे या सर्व गोष्टी रेखीवपणात अंतर्भूत होतात. स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाला गबाळेपणाचे स्वरूप आणणाऱया गोष्टी टाळल्या पाहिजेत तसेच वागण्यात, बोलण्यात रेखीवपणा आहे ना, याची सतत काळजी घ्यावी.

‘ग’ – गर्व ः बहुतेकांना आपल्या संपत्तीचा अथवा कर्तृत्वाचा अथवा सत्तेचा गर्व असतो. हे सर्व क्षणभंगुर आहे हे लक्षात ठेवून गर्वाला तिलांजली द्यावी.

‘म’ – मन ः मनाला आवर घालावा. आयुष्यातील सुख-दुःखाचा संबंध मनाशी निगडित असतो. हे मन चांगल्या छंदात गुंतवावे.

‘प’ – परमेश्वर ः समाजकार्य अथवा लोकोपयोगी कार्य जमत नसेल तर भक्तीत आपला वेळ घालवणे चांगले. परमेश्वर – भक्तीने मनःस्वास्थ चांगले राहील.

‘ध’ – धन ः प्रत्येकाने धनाचा योग्य विनियोग करावा. स्वतःच्या मामुली गरजा स्वतःच्या कमाईतूनच कराव्यात. पैशांची गुंतवणूक तज्ञांचा सल्ला घेऊन करावी. पैशाभोवती जग फिरते हे ध्यानात ठेवावे व पैशांचा विनियोग योग्य करावा.

‘नी’ – नीतिमत्ता ः दुसऱयाचे स्वतःच्या फायद्यासाठी अहित चिंतणे, दुसऱयाची मने कलुषित करणे, दुसऱयाला धारदार शब्दांनी दुखविणे, निंदा करणे या गोष्टी नीतिमत्तेला कलंक लावणाऱया आहेत त्या टाळल्या पाहिजेत. ही व्यक्ती अतिशय सज्जन आहे, असे मत आपल्याबद्दल होणे नीतिमत्तेला धरून ठरेल.

‘सा’ – सामंजस्य ः समजूतदारपणा हा सर्वात महत्त्वाचा आहे. प्रसंग पाहून वागणे म्हणजे सामंजस्य. घरात अथवा समाजात आपल्यालाच मोठेपणा मिळावा, माझेच सर्वांनी ऐकले पाहिजे, माझीच मते योग्य, मी सांगतो म्हणून झाले पाहिजे, असा हट्ट म्हणजे असमंजसपणा व वितुष्टतेला आवाहन ठरतो. घरोदारी, शेजारी, समाजात वावरताना हीच भूमिका आपल्या मनाला आनंद देणारी ठरेल.

वरील सर्व सद्गुणांचा वृद्ध व्यक्तींच्या जीवनात समावेश झाला तर त्यांचे जीवन सुखी, समाधानी होऊन आपली जीवननौका अथांग सागर सहजतेने पार करील. तरुणांना वृद्ध माणसे अडचण वाटणार नाहीत, तर आधार वाटतील.