पर्यटकांसाठी पहलगाम बंदच, कश्मीरमधील 7 पर्यटनस्थळे खुली

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर बंद करण्यात आलेली कश्मीर खोऱ्यातील 7 पर्यटनस्थळे सोमवारी पर्यटकांसाठी पुन्हा खुली करण्यात आली. या यादीत पहलगामचे नाव नाही. त्यामुळे तूर्त तरी पहलगाम पर्यटकांसाठी बंदच राहणार आहे.

जम्मू-कश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या बैठकीत पर्यटनस्थळे खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला. पहलगामच्या बैसारन परिसरात 22 एप्रिल 2025 रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांना गोळय़ा घालून ठार करण्यात आले होते. या हल्ल्यानंतर प्रशासनाने कश्मीर खोऱयातील आणि जम्मूतील जवळपास 50 पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला होता.

‘या’ ठिकाणी जाण्यास मुभा

कश्मीर खोऱयातील जी सात पर्यटनस्थळे खुली करण्यात आली आहेत त्यात आडू व्हॅली, राफ्टिंग पॉइंट यन्नर, अक्कड पार्क, पादशाही पार्क, कमान पोस्ट यांचा समावेश आहे. याशिवाय जम्मूतील 5 पर्यटनस्थळे खुली करण्यात आली आहेत. यात डगन टॉप (रामबन), घग्गर (कठुआ), शिव गुफा (सालाल, रियासी) यांचा समावेश आहे. याआधी जून महिन्यात 16 पर्यटनस्थळे खुली करण्यात आली होती.