महत्त्वाच्या बातम्या – नीलेश घायवळ स्वित्झर्लंडमध्ये

किरकोळ कारणावरून तरुणावर गोळीबार प्रकरणात कुख्यात गुंड नीलेश घायवळ याच्याविरुद्ध कोथरूड पोलिसांनी ‘मोक्का’नुसार कारवाई केली. मात्र, गुन्हा दाखल होताच आरोपी घायवळने बनावट कागदपत्रांच्या आधारे बनविलेल्या पासपोर्टद्वारे स्वित्झर्लंड गाठले आहे. त्या ठिकाणी राहण्यासाठी त्याला 90 दिवसांचा व्हिसा मिळाला आहे. अहिल्यानगर पोलिसांनी त्याला पासपोर्ट दिल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, संबंधितांविरुद्ध विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल असतानाही अहिल्यानगर पोलिसांनी घायवळला पासपोर्ट दिला कसा? याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे.

कॉफी दिनाचे हटके सेलिब्रेशन

1 ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय कॉफी दिन आहे. यानिमित्ताने मॅक कॅफे रेस्टॉरंटने कॉफी प्रेमींसाठी ‘बी युवर ओन बरिस्ता’ अनोखा उपक्रम आयोजित केला आहे. यामध्ये  कॉफी दिन साजरा करून आपल्या पद्धतीची कॉफी बनवायची आहे. या उपक्रमात वेगवेगळ्या प्रकारच्या कॉफी संकल्पना जाणून घेता येतील. हा खास, संवादात्मक कार्यक्रम मुंबई, पुण्यासह देशातील 50 मॅकडोनाल्ड रेस्टॉरंटमध्ये 1 ऑक्टोबरपर्यंत दुपारी 3  ते 5 यावेळेत होईल.

शिरीष चंद्र मुर्मू आरबीआयच्या डेप्युटी गव्हर्नरपदी

केंद्र सरकारने शिरीष चंद्र मुर्मू यांची भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) च्या डेप्युटी गव्हर्नरपदी नियुक्ती केली आहे. मुर्मू यांचा डेप्युटी गव्हर्नरपदाचा कार्यकाळ हा तीन वर्षांचा असणार आहे, असे नियुक्तीपत्रात म्हटले आहे. कॅबिनेट कमिटीकडून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर त्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.