मुंबई लोकल – माथाडी कामगारांचे दसरा संमेलन

अखिल भारतीय माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन, बाबुराव रामिष्ठs माथाडी कामगार सहकारी पतपेढी, अखिल भारतीय माथाडी कामगार सहकारी ग्राहक सोसायटी आणि माथाडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दसरा संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे संमेलन 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत संघटनेच्या कर्नाक बंदर येथील मुख्य कार्यालयात होणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस अविनाश रामिष्टे यांनी सांगितले.

नवरात्रीनिमित्त डॉक्टर, पोलीस, वकील, नर्स, शिक्षिका, पोस्टवुमन अशा विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा शिवसैनिकांच्या वतीने सन्मान करण्यात आला. घाटकोपर पूर्व येथील पंतनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लता सुतार यांना सन्मानित करताना घाटकोपर शिवसेना विधानसभा कार्यालय प्रमुख प्रकाश वाणी, महाराष्ट्र शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सेनेचे राज्य सचिव सचिन भांगे, शाखा संघटक चंद्रकांत हळदणकर आदी मान्यवर उपस्थित होते.

व्यंगचित्रकार संजय मिस्त्री यांच्या नवीन पुस्तकांचे वाटप

व्यंगचित्रकार संजय मिस्त्री यांच्या विविध विषयांवरील व्यंगचित्रे असलेल्या दोन पुस्तकांच्या नवीन आवृत्तीच्या प्रती ज्येष्ठ स्तंभलेखक श्रीकृष्ण हरचांदे यांना देण्यात आल्या. यावेळी उद्योजक मेघनाथ शेट्टी, संजय मिस्त्री, गौरव कदम उपस्थित होते. राजकीय, सामाजिक व समाज प्रबोधनविषयक शंभरहून अधिक व्यंगचित्रे या पुस्तकात संजय मिस्त्री यांनी रेखाटलेली आहेत.

मिलिंद इंगळे यांचा मुखातिब

वरळीच्या नेहरू सेंटरच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने मिलिंद इंगळे यांच्या ‘मुखातिब’ या हृदयस्पर्शी गझलांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम 8 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजता वरळीच्या नेहरू सेंटरच्या सभागृहात होणार असून प्रेक्षकांना विनामूल्य प्रवेश पत्रिका 3 ऑक्टोबरला सकाळी 10.30 वाजल्यापासून तिकीट काउंटरवर उपलब्ध होतील. एकापेक्षा एक सरस गाणी सादर करून मिलिंद इंगळे प्रेक्षकांना जिंकणार आहेत. कार्यक्रमासाठी विशाल धुमाळ, चिंटू सिंग वासीर, समीर शेवगार, सुहाईल अख्तर याची संगीत साथ त्यांना लाभणार आहे.