
क्रीडा स्पर्धेतील राजकारणाचा बळी एक आदिवासी मुलगा ठरला होता. जलतरण स्पर्धेत पहिला क्रमांक आला असताना त्याला डावलले गेले होते. आपल्या मुलावर झालेल्या अन्यायाविरोधात वडिलांनी आवाज. वडिलांनी पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार केली. सामना ऑनलाइनवर ही बातमी प्रसिद्ध होताच साऱ्यांचे धाबे दणाणले. शेवटी प्रशासन झुकले. स्पर्धा दुसऱ्यांदा घेतली गेली. राज्यातील ही पहिलीच वेळ असावी. खरंतर ही एक प्रकारची अग्नी परीक्षाच होती. मुलाने अपेक्षेप्रमाणे पहिला क्रमांक पटकवीला. या आदिवासी मुलाचे नाव आहे प्रिन्स कोडापे. ५० मीटर मध्ये प्रिन्सने प्रथम क्रमांक मिळावीला तर तत्सम अनिल झाडे या मुलाने दुसरा क्रमांक पटकवीला. १०० मीटर मध्ये सारांश रामटेके प्रथम ठरला.
काय आहे प्रकरण
जिल्हा क्रिडा संकूल चंद्रपूर येथील जलतरण तलावावर जिल्हास्तरीय शालेय जलतरण स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. क्रीडा संकूल तर्फे जलतरण प्रशिक्षक श्रीकांत बालकी हे आयोजक होते. या स्पर्धेची माहिती जिल्ह्यातील सर्व शाळांना देण्यात आली. शाळेकडून जलतरणपटू विद्यार्थी यांना त्यांच्या वयोगटनुसार स्पर्धामध्ये भाग घेण्याकरता ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. या स्पर्धेत चांदा पब्लिक स्कूल दाताळा रोड चंद्रपूर या शाळेतील प्रिन्स उमेश कोडापे यांने ऑनलाईन अर्ज भरून प्रवेश मिळवला. 14 वर्ष वयोगटातील 50 मिटर फ्रीस्टाईल व 100 मिटर फ्रीस्टाईल या दोनही स्पर्धामध्ये त्याने सहभाग घेतला. स्पर्धा बघण्यासाठी प्रिन्सचे वडील उमेश कोडापे हे गेले होते. त्यांचा म्हणण्यानुसार, 50 मिटरचे फ्री स्टाईल स्पर्धा झाली त्यावेळेस माझ्या मुलचा क्रमांक हा प्रथम होता. त्याचा टायमिंग (46.41) होता. हे त्यांनी स्वत: बघितले. 100 मिटर फ्रीस्टाईलमध्ये मुलाचा दुसरा क्रमांक आला होता, असा त्यांचा दावा होता.
स्पर्धा पूर्ण झाल्यानंतर अतिम निकाल जाहीर झाला. त्यात प्रिन्सचे नाव नव्हते. त्यामुळे त्यांना धक्का बसला. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यानंतर सारी सूत्र हलली आणि स्पर्धा पुन्हा एकदा घेऊन निर्णय घेण्यात आला. दरम्यान, या घटनेला जे कारणीभूत, ज्यांनी या स्पर्धेमध्ये घोळ केला, ज्यांची पालकांनी तक्रारीही केली आहे, त्यांच्यावर कारवाई कधी होणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागलेलं आहे.