सांगलीतील 51 हजार हेक्टरवरील पिकं मातीमोल, 291 गावे बाधित; 1 लाख शेतकऱ्यांना फटका

sangli flood

कधी नव्हे यंदा सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस पावसाने जिह्याची सरासरी ओलांडली आहे. ढगफुटीसदृश आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या पावसाच्या तडाख्याने दुष्काळी तालुक्यातील 291 गावे बाधित झाली. जिह्यातील 96 हजार 186 शेतकऱयांना फटका बसला असून, तब्बल 51 हजार 387 हेक्टर क्षेत्रावरील पिकांची माती झाली आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील सर्वाधिक 22 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. डाळिंब, ऊस, सोयाबीन, भुईमूग तसेच भाजीपाल्यासह इतर पिकांना मोठा फटका बसला. त्यामुळे नुकसानीत मोठी वाढ होऊन हातातोंडाशी आलेले पीक शेतकऱयांच्या हातून गेले असून, दसरा अन् दिवाळी कशी साजरी करायची, या चिंतेत बळीराजा आहे.

ऑगष्ट महिन्यात आलेला पूर आणि अतिवृष्टीमुळे जिह्यातील शेतकरी कोलमडून पडला होता. त्यानंतर पावसाने उसंत घेतली होती. मात्र, सप्टेंबरच्या अखेरीस झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपाची हातातोंडाला आलेली पिके वाया गेली आहेत. ऑगष्टमध्ये पश्चिम भागातील पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले होते. त्यानंतर शनिवारी (दि. 27) रोजी एका दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे उर्वरित पिकांची माती झाली. जिह्यातील तासगाव, कवठेमहांकाळ, मिरज आणि जत या दुष्काळी पट्टय़ात सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे जिरायत, बागायत आणि फळपिकांना मोठा फटका बसला आहे. 291 गावांतील 96 हजार 186 शेतकऱयांचे 53 हजार 387 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक नजर अंदाज अहवाल कृषी विभागाने तयार केला आहे.

सांगली जिह्यात ऑगस्ट महिन्यात वारणा आणि कृष्णाकाठच्या पिकांचे नुकसान झाले. मात्र, सप्टेंबरच्या अखेरीस दुष्काळी भागातील तासगाव, कवठेमहांकाळ, आटपाडी, जत या तालुक्यांत मुसळधार पावसाने हजेरी लावली. पूर्वभागात मुसळधार पाऊस झाला. या पावसाने पिकांत पाणी उभेच साचून राहिल्याचे चित्र आहे. त्यामुळे खरिपातील पिकांचे नुकसान अजून वाढणार असल्याची भीती निर्माण झाली आहे. तसेच भाजीपाला पिकांचेही नुकसान झाले आहे.

अतिवृष्टीने 291 गावांतील 22 हजार 337 हेक्टरवरील बागायत, 16 हजार 965 जिरायत, 12 हजार 84 हेक्टर फळपिकांचे नुकसान झाले. कवठेमहांकाळ तालुक्यातील 40 हजार 602 शेतकऱयांचे सर्वाधिक 22 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. आटपाडी तालुक्यातील 20 हजार 122 शेतकऱयांचे 12 हजार 96 हेक्टरवरील, तासगाव तालुक्यातील 17 हजार 220 शेतकऱयांचे 8 हजार 860 हेक्टर, जत तालुक्यातील पंधरा शेतकऱयांचे 8 हजार हेक्टवरील पिकांचे नुकसान झाले. मात्र, अपर संख तहसील कार्यालय क्षेत्रातील 14 हजार 486 शेतकऱयांचे 7 हजार 619 हेक्टवरील नुकसान झाले.

मिरज तालुक्यातील 2 हजार 305 शेतकऱयांचे 1 हजार 529 हेक्टर, खानापूर तालुक्यात 715 शेतकऱयांचे 397 हेक्टर, वाळवा तालुक्यातील 143 शेतकऱयांचे 55.70 हेक्टर, आष्टा अपर तहसील क्षेत्रातील 3.40 हेक्टर तसेच शिराळा तालुक्यातील एक हेक्टरवरील पिके वाया गेली. डाळिंब, द्राक्ष, ऊस, सोयाबीन, भुईमूग, मूग, उडीद, हळद, केळी या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले. पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची प्रशासनाकडून पाहणी करण्याचे काम सुरू आहे. कोणत्या भागात किती प्रमाणात नुकसान झाले आहे, याची माहिती कृषी विभागाकडूनही घेण्यात येत आहे.

पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू – विवेक कुंभार

अतिवृष्टीमुळे जिह्यातील 291 गावांतील 96 हजार 186 शेतकऱयांचे 53 हजार 387 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक नजर अंदाज अहवाल कृषी विभागाने तयार केला आहे. अद्यापही नुकसानीच्या आकडेवारीत वाढ होणार असून, नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी सांगितले.