
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याप्रमाणेच आपल्यालाही शांततेचा नोबेल पुरस्कार मिळायलाच हवा या हट्टाने सध्या प्रे. ट्रम्प झपाटलेले आहेत. नोबेल पुरस्काराचे भूत त्यांच्या मानगुटीवर असल्याने ‘मी जगातली इतकी युद्धे थांबवली’ अशा पिपाण्या ते रोज वाजवीत आहेत. इतरही अनेक खटपटी, लटपटी करीत आहेत. मात्र दुसरीकडे त्याच ओबामांच्या नावाने असलेल्या आरोग्य योजनेला कात्री लावून डेमोक्रॅटिक पक्षाला दुखविण्याचा तऱ्हेवाईकपणाही करीत आहेत. हे ‘बळजबरीचे शटडाऊन’ आहे अशा शब्दांत डेमोक्रॅटिक पक्षावर टीका करीत आहेत. त्यामुळे शटडाऊनचे हे संकट आणखी किती काळ राहील, या प्रश्नाचे उत्तर कदाचित तऱ्हेवाईक प्रे. ट्रम्प हेदेखील देऊ शकणार नाहीत!
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प सध्या भारतासह संपूर्ण जगावर दादागिरी करीत आहेत. अनेक देशांना आर्थिक नाकेबंदीच्या धमक्या देत आहेत. मात्र आता ट्रम्प तात्यांच्याच अमेरिकेत ‘शटडाऊन’ची आफत आली आहे. त्यामुळे अमेरिकेतील संपूर्ण सरकारी कामकाज ठप्प झाले आहे. अमेरिकन सीनेट जोपर्यंत ‘फंडिंग बिल’ मंजूर करीत नाही, तोपर्यंत ‘शटडाऊन’ सुरूच राहील आणि त्याचा त्रास सरकारी कर्मचाऱ्यांसह सर्वसामान्य अमेरिकन जनतेला सहन करावा लागेल. अमेरिकेत सरकारी वर्ष 1 ऑक्टोबर रोजी सुरू होते. त्याआधी सरकारच्या आगामी वर्षाच्या खर्चासाठी ज्या तरतुदी केल्या जातात, त्यांना अमेरिकन काँग्रेसची मंजुरी मिळणे आवश्यक असते. ती मिळाली नाही, तर सरकारी खर्च थांबतो आणि ‘शटडाऊन’चे संकट ओढवते. आता तेच झाले आहे. ट्रम्प यांचे काही हेकेखोर निर्णय या परिस्थितीला कारणीभूत आहेत. सरकारी खर्चात कपात व्हायला हवी, अशी प्रे. ट्रम्प यांची भूमिका आहे. प्रशासकीय खर्चांना कात्री लावली पाहिजे. यादृष्टीने त्यांनी निर्णयही घेतले आहेत. ट्रम्प सरकारचे एक धोरण म्हणून हे ठीक असले तरी ट्रम्प यांचा एककल्लीपणा आणि आततायीपणा यामुळे त्यात विनाकारण गुंतागुंत झाली आहे. सरकारी खर्च कपातीच्या नादात ट्रम्प महाशयांनी आरोग्य सेवेसह अनेक महत्त्वाच्या
सरकारी सेवांवर बुलडोझर
फिरवला. त्यातही ‘ओबामा हेल्थ केअर अनुदान कार्यक्रमां’बाबतच्या ट्रम्प सरकारच्या धोरणामुळे सत्ताधारी रिपब्लिकन पक्ष आणि विरोधी डेमोक्रॅटिक पक्ष यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. वास्तविक ‘फंडिंग बिल’ मंजूर करून घेण्यासाठी सत्ताधारी रिपब्लिकन पक्षाला 60 सदस्यांचा पाठिंबा आवश्यक होता. हा आकडा आपल्याकडे नाही, याची जाणीव ठेवून प्रे. ट्रम्प यांनी ‘सुवर्णमध्य’ काढण्याचा प्रयत्न करायला हवा होता, परंतु आपल्याच हेक्यात आणि ठेक्यात असणाऱ्या ट्रम्प यांनी तसा प्रयत्नही केला नाही. उलट ‘ओबामा हेल्थ केअर अनुदान कार्यक्रमा’ला त्यांनी धक्का लावला. त्या आगीत अनेक सरकारी कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्याच्या धमकीचे तेल ओतले. त्यात माजी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांची दोनच दिवसांपूर्वी अत्यंत अश्लाघ्य शब्दांत हेटाळणी केली. त्यामुळे विरोधी डेमोक्रॅटिक पक्ष आपल्या भूमिकेवर अडून बसला. साहजिकच सीनेटमध्ये ट्रम्प सरकारने मांडलेले तात्पुरते विधेयक फेटाळले गेले आणि ट्रम्प यांच्या कार्यकाळात पुन्हा शटडाऊन ओढवण्याची नामुष्की ओढवली. प्रे. ट्रम्प यांच्या याआधीच्या कार्यकाळातील शटडाऊन अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठे म्हणजे 35 दिवसांचे होते. आताचे शटडाऊन किती काळ चालते, रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक यांच्यातील आरोग्य सेवांबाबत असलेला भूमिकांचा
तिढा कधी सुटतो
यावर शटडाऊनचा काळ अवलंबून असेल. आरोग्य योजनांना ‘निधी विधेयका’तून वगळण्यावर ट्रम्प यांचा पक्ष ठाम आहे, तर ‘ओबामा हेल्थ केअर अनुदान कार्यक्रमा’ला दिले जाणारे फायदे वाढवायला हवेत, त्याशिवाय विधेयकाला पाठिंबा देणार नाही. हा फायदा काढून घेतला तर लाखो अमेरिकनांसाठी वैद्यकीय उपचार, औषधे महाग होतील व गरीबांना त्याचा फटका बसेल या मतावर विरोधी पक्ष ठाम आहे. या त्रांगड्यात ‘फंडिंग बिल’ फसले आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याप्रमाणेच आपल्यालाही शांततेचा नोबेल पुरस्कार मिळायलाच हवा या हट्टाने सध्या प्रे. ट्रम्प झपाटलेले आहेत. नोबेल पुरस्काराचे भूत त्यांच्या मानगुटीवर असल्याने ‘मी जगातली इतकी युद्धे थांबवली’ अशा पिपाण्या ते रोज वाजवीत आहेत. इतरही अनेक खटपटी, लटपटी करीत आहेत. मात्र दुसरीकडे त्याच ओबामांच्या नावाने असलेल्या आरोग्य योजनेला कात्री लावून डेमोक्रॅटिक पक्षाला दुखविण्याचा तऱ्हेवाईकपणाही करीत आहेत. हे ‘बळजबरीचे शटडाऊन’ आहे अशा शब्दांत डेमोक्रॅटिक पक्षावर टीका करीत आहेत. त्यामुळे शटडाऊनचे हे संकट आणखी किती काळ राहील, या प्रश्नाचे उत्तर कदाचित तऱ्हेवाईक प्रे. ट्रम्प हेदेखील देऊ शकणार नाहीत!