
देशातील प्रत्येक कुटुंबाने वर्षाला किमान पाच हजार रुपयांच्या खादीच्या वस्तू खरेदी कराव्यात, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज केले. गांधी जयंतीचे औचित्य साधून शहा यांनी दिल्लीतील एका शोरूममधून खादीचे कपडे खरेदी केले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात त्यांनी स्वदेशीचा नारा दिला. लोकांनी कापडाच्या वस्तू खरेदी करताना खादीला प्राधान्य द्यावे. त्यामुळे लाखो लोकांना रोजगार मिळेल, असे शहा म्हणाले. महात्मा गांधी यांनी खादी आणि स्वदेशी हे दोन मंत्र देऊन स्वातंत्र्य चळवळीला बळ दिले होते. अलीकडे आपण ते विसरलो आहोत, असे त्यांनी सांगितले. पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर अलीकडे लाखो लोकांनी स्वदेशी वस्तू वापरण्यास सुरुवात केली आहे, असा दावा त्यांनी केला.