लोकशाहीवरील घाऊक हल्ले हा हिंदुस्थानसाठी सर्वात मोठा धोका, राहुल गांधी यांचा मोदी सरकारवर निशाणा

‘मोदी सरकारच्या राजवटीत लोकशाहीवर घाऊक हल्ले होत असून हाच हिंदुस्थानसाठी सर्वात मोठा धोका आहे,’ असा घणाघात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज केला. कोलंबिया दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी येथील एका विद्यापीठातील चर्चासत्रात भाग घेताना हिंदुस्थानातील सद्यस्थितीवर परखड भाष्य केले. ‘हिंदुस्थान हा अनेक धर्म, अनेक परंपरा, अनेक भाषा, विविध विचारधारांचा देश आहे. या सगळ्यांना त्यांची स्वतंत्र ओळख जपता आली पाहिजे. ही ओळख टिकवण्याचा एकमेव मार्ग लोकशाही व्यवस्था हाच आहे. मात्र सध्या या व्यवस्थेवर घाऊक हल्ले होत आहेत, असे ते म्हणाले.

‘चीन आणि हिंदुस्थानात बराच फरक आहे. चीन ज्या पद्धतीने दडपशाही करून देश चालवतो, तसे आपण करू शकत नाही. त्यांच्याकडे एकाधिकारशाही आहे. हिंदुस्थानात ही पद्धत कदापि स्वीकारली जाणार नाही, असे राहुल गांधी म्हणाले.

हिंदुस्थानात भ्रष्टाचाराचेही केंद्रीकरण

‘हिंदुस्थानात भ्रष्टाचाराचेही केंद्रीकरण झाले आहे. प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. देशातील तीन ते चार कंपन्यांनी जवळपास संपूर्ण अर्थव्यवस्था ताब्यात घेतली आहे. या कंपन्यांचे थेट पंतप्रधानांशी लागेबांधे असल्याने ते सुस्साट सुटले आहेत, असा आरोप राहुल यांनी केला. भाजप आणि आरएसएसवरही त्यांनी हल्ला चढवला. ‘भेकडपणा हा आरएसएसच्या विचारांचा गाभा आहे. कमकुवत लोकांवर जुलूम करणे, त्यांना मारणे ही त्यांची विचारधारा आहे, असा संताप राहुल यांनी व्यक्त केला.