
मुंबई पोलिसांची कॅण्टीन आता डी-मार्टच्या धर्तीवर सुरू झाली आहेत. त्यामुळे कॅण्टीनमध्ये अन्य साहित्यांबरोबर आता अन्न-धान्य आणि खाद्यपदार्थदेखील स्वस्तात व मुबलक प्रमाणात मिळणार आहेत. नूतनीकरण केलेल्या नायगाव मुख्यालयातील मुख्य कॅण्टीनचे आज पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
नायगाव येथील पोलीस मुख्यालयात पोलीस कॅण्टीन गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे. तेथे पोलिसांना आवश्यक साहित्य सबसिडीतून दिले जाते, परंतु पोलीस आयुक्तांनी या कॅण्टीनला आणखी भव्य रूप देण्याचा संकल्प केला आणि त्यातूनच डी-मार्टच्या धर्तीवर पोलिसांना अन्य साहित्यांबरोबरच अन्नधान्य, खाद्यपदार्थदेखील स्वस्तात व मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कॅण्टीनचे नूतनीकरण करण्यात आले असून नवा साज चढलेल्या कॅण्टीनचे आज आयुक्त देवेन भारती यांच्या हस्ते उद्घाटन झाले. याच कॅण्टीनमधून शहरातील अन्य चार ‘ल’ विभागातील कॅन्टीनमध्येदेखील सर्व साहित्य, अन्नधान्य, खाद्यपदार्थ पोलिसांसाठी स्वस्तात उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.