
धुवांधार पावसाने उल्हासनगरमधील निकृष्ट काम केलेल्या रस्त्यांची अक्षरशः दैना उडाली आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांनी वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. खड्यांचे हे विघ्न दूर करण्यासाठी आता पालिका आयुक्तच ऑन फिल्ड उतरले असून त्यांनी दहा स्पॉटची पाहणी केली. आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी अधिकाऱ्यांना खडसावत तत्काळ दुरुस्तीचे कामे हाती घेण्याचे आदेश दिले.
शहरात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून धोबी घाट रोड, कल्याण मुरबाड रोड, खेमानी भाजी मार्केट चौक, खेमानी चौक, माणिक जिरा चौक, मध्यवर्ती पोलीस स्टेशन ते मयूर हॉटेल रस्ता, फ्लॉवर लाइन चौक, कल्याण-बदलापूर रोड, छत्रपती शाहू महाराज उड्डाणपूल, लालचक्की ते उल्हासनगर रेल्वे स्टेशन रोड, व्हिनस चौक ते नेताजी चौक या रस्त्यांची चाळण झाली आहे. पावसामुळे या रस्त्यांवर चिखल झाला असून पाणी साचल्याने रस्त्यांवरील खड्डे न दिसल्याने दुचाकी घसरण्याच्या व अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. याबाबत तक्रारी प्राप्त होताच महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी रस्त्यावर उतरत पाहणी केली.
अधिकाऱ्यांना सूचना
सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे भरून घेण्याची कामे जलदगतीने करण्याचे आदेश आयुक्त आव्हाळे यांनी उपअभियंता व कनिष्ठ अभियंत्यांना दिले. तसेच जलवाहिनीचे लिकेज तत्काळ बंद करून दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रभागातील रस्त्यांचे डांबरी व काँक्रीटमध्ये वर्गीकरण करून त्याची यादी सादर करावी व आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेशही आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी अधिकाऱ्यांना दिले.