४ मिनिटांच्या झूम कॉलमध्ये हिंदुस्थानी कर्मचाऱ्यांची हकालपट्टी, प्रश्न विचारण्यास मनाई

दूरस्तपद्धतीने एका अमेरिकन कंपनीमध्ये काम करणाऱ्या एका हिंदुस्थानी कर्मचाऱ्याने आपली नोकरी गमावण्याचा अनुभव Reddit वर शेअर केला आहे. हा अनुभव आता इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. पोस्टनुसार, कंपनीच्या चीफ ऑपरेटिंग ऑफिसर (COO) सोबतच्या अवघ्या ४ मिनिटांच्या मीटिंगमध्ये या कर्मचाऱ्याला आणि इतर अनेक हिंदुस्थानी कर्मचाऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून काढून टाकण्यात आले.

कर्मचाऱ्याने या घटनेचे वर्णन करताना सांगितले, ‘तो नेहमीप्रमाणेच एक कामाचा दिवस होता. मी सकाळी ९ वाजता लॉग इन केले आणि ११ वाजता सीओओसोबतच्या महत्त्वाच्या मीटिंगसाठी एक कॅलेंडर इनव्हाईट पाहिले. कॉल सुरू झाल्यावर, त्यांनी सर्व कॅमेरे आणि मायक्रोफोन बंद केले आणि सांगितले की हिंदुस्थानातील बहुतांश कर्मचाऱ्यांची कामावरून हकालपट्टी करण्यात येत आहे’.

सीओओने स्पष्ट केले की, ही हकालपट्टी कर्मचाऱ्यांच्या कामगिरीशी संबंधित नसून अंतर्गत पुनर्रचना प्रक्रियेचा भाग आहे.

कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकार अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याची संधी देण्यात आली नाही. सीओओने कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास नकार दिला आणि ही बातमी दिल्यानंतर लगेचच कॉल सोडून गेले. ज्या कर्मचाऱ्यांची हकालपट्टी झाली, त्यांना एक ईमेल येईल असे सांगण्यात आले.

कर्मचाऱ्याने पुढे सांगितले की, कंपनीने ऑक्टोबर महिन्याचा पूर्ण पगार देण्याचे आणि शिल्लक असलेल्या सुट्ट्यांचे पैसे देण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, कर्मचाऱ्याने आपल्या भावना व्यक्त करताना लिहिले, ‘पहिल्यांदाच मी कामावरून काढलो गेलो आहे आणि हे खरंच खूप वाईट आहे’.

या पोस्टनंतर सोशल मीडियावर अनेक लोकांनी सहानुभूती व्यक्त केली आहे. अनेकांनी नोकरीच्या नव्या संधी आणि सांत्वनपर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने, ‘तुमचे प्रोफाइल काय आहे? मी मदत करू शकत असेन तर डीएम करा’, असे लिहिले. दुसऱ्या एकाने, ‘मित्रा, तुझी भूमिका आणि अनुभव काय आहे? मला डीएम कर, मी तुला मदत करू शकेन’, असे लिहिले.

तिसऱ्या एका युजरने प्रोत्साहनपर शब्द देत म्हटले, ‘पुढे नक्की काय करायचे आहे याचा विचार करण्याची ही एक संधी आहे. तुम्ही जे करत आहात तेच किंवा काहीतरी नवीनही करू शकता. निराश होऊ नका – तुम्ही यातून अधिक मजबूत होऊन बाहेर पडाल. तुमच्या ओळखीच्या लोकांशी संपर्क साधा किंवा नवीन नोकरीसाठी नवीन लोकांशी संबंध जोडण्यास सुरुवात करा’.