मानवी हक्कांचे घोर उल्लंघन, PoK मधील पाकिस्तानी कारवायांवर हिंदुस्थानची टीका

पाकव्याप्त कश्मीरमधील निदर्शने आणि पोलिसांच्या कारवाईवर हिंदुस्थानने तीव्र शब्दात टीका केली आहे. देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, “आम्ही पाकव्याप्त जम्मू आणि कश्मीरच्या अनेक भागांमध्ये विरोध प्रदर्शनांच्या बातम्या पाहिल्या आहेत, ज्यात पाकिस्तानी सेनेने निर्दोष नागरिकांवर केलेली क्रूरतेची माहिती समोर आली आहे.”

रणधीर जयस्वाल म्हणाले की, “पाकिस्तानच्या दडपशाही वृत्तीचा आणि या भागातील संसाधनांच्या पद्धतशीर लूटमारीचा हा नैसर्गिक परिणाम आहे. पाकिस्तानला त्याच्या भयावह मानवी हक्क उल्लंघनांसाठी जबाबदार धरले पाहिजे, असे आम्हाला वाटते.”

दरम्यान, जीवनावश्यक वस्तू व सेवांवरील अनुदानात कपात करण्याच्या विरोधात पाकव्याप्त कश्मीरमध्ये जनक्षोभ उसळला आहे. ‘पीओके’तील अनेक शहरांत हजारो नागरिक रस्त्यावर उतरले असून त्यांनी पाकिस्तान सरकारविरोधात एल्गार पुकारला आहे. आंदोलकांनी पाकिस्तानी सैन्याच्या 25 जवानांना ओलीस ठेवले आहे. आंदोलना दरम्यान सैन्याकडून झालेल्या गोळीबारात गेल्या चार दिवसांत 10 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 100हून अधिक जखमी झाले आहेत.