अतिवृष्टीने त्रस्त शेतकऱ्यांसाठी शिवसेना रस्त्यावर उतरणार, रविवारपासून मराठवाडाव्यापी आंदोलन

अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, त्यांना त्वरित आर्थिक मदत मिळावी, या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने रविवारपासून मराठवाडाव्यापी आंदोलन करणार आहे. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती, पंजाबच्या धर्तीवर हेक्टरी ५० हजार रुपये मदत, पीक विम्याचे नवीन निकष रद्द करून पूर्वीचे निकष कायम ठेवावेत, तसेच घरांचे आणि पशुधनाचे नुकसान भरपाई तातडीने द्यावी, या प्रमुख मागण्यांसाठी शिवसेनेने ५ ते ११ ऑक्टोबर दरम्यान मराठवाडाव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

५, ६ आणि ७ ऑक्टोबर : मराठवाड्यातील गावांमध्ये ग्रामसभा, गावभेटी आणि गावबैठकांचे आयोजन करून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या जाणार आहेत.

८ ऑक्टोबर : प्रत्येक तहसील कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयांवर धरणे आणि निदर्शने आयोजित केली जाणार आहेत.

११ ऑक्टोबर : छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्तालयावर मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा भव्य ‘हंबरडा मोर्चा’ काढला जाणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करणार आहेत.