Jane Goodall Passed away विज्ञानविश्वाचीच नाही, तर संपूर्ण मानवजातीची हानी; तेजस ठाकरे यांच्याकडून आदरांजली

डॉ. जेन गुडाल यांच्या निधनामुळे केवळ विज्ञानविश्वाचीच नव्हे तर संपूर्ण मानवजातीची हानी झाल्याची भावना व्यक्त करीत तेजस ठाकरे यांनी आदरांजली वाहिली. त्यांची भेट घेण्याची संधी मिळाली, याबद्दल मी भाग्यवान समजतो. त्यांचा साधेपणा, नम्रता, आपुलकी पाहून मी भारावून गेलो, असे तेजस ठाकरे यांनी नमूद केले.

डॉ. जेन गुडाल यांनी पर्यावरण रक्षणासाठी पूर्णवेळ झोकून दिले. गेल्या वर्षी मुंबईमध्ये त्यांची भेट झाली. ज्येष्ठ प्राइमेटोलॉजिस्ट, निसर्ग, पर्यावरण व प्राणी अभ्यासक असलेल्या डॉ. जेन यांच्यासोबत झालेल्या संवादात त्यांनी संशोधन, वन्यजीव संवर्धन आणि भविष्यातील पिढय़ांसाठी जंगल व पर्यावरण जपण्याचे महत्त्व याबाबत सखोल विचार मांडले. मीही त्यांना ठाकरे वाइल्डलाईफ फाऊंडेशनच्या माध्यमातून सह्याद्रीच्या समृद्ध जैवविविधतेचे व जंगलांचे रक्षण करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली, अशा शब्दांत तेजस ठाकरे यांनी जेन यांच्या स्मृती जागवल्या.

त्यांचे कार्य अनेक पिढय़ांना प्रेरणा देईल!

चिपांजीवर सखोल संशोधन करणाऱया जेन यांच्या जाण्यामुळे संशोधन जगताची मोठी हानी झाली आहे. डॉ. जेन गुडाल यांचे अद्वितीय कार्य आणि निसर्गावरील त्यांचे निःस्वार्थ प्रेम पुढील अनेक पिढय़ांना वन्यजीव आणि पर्यावरण रक्षणासाठी प्रेरणा देत राहील, असे तेजस ठाकरे यांनी शोकसंदेशात नमूद केले.