
सर्वांना अन्नाचा घास देणारा महाराष्ट्रातला शेतकरी अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झाला आहे. त्याची शेती आणि संसार पाण्यात वाहून गेला. पाणावलेल्या डोळय़ांनी बेंबीच्या देठापासून ओरडून तो मायबाप सरकारकडे मदत मागतोय. पण निर्दयी महायुती सरकार त्याचे आर्जव ऐकण्यास तयार नाही. त्यामुळे शिवसेना शेतकऱ्यांसाठी धावून गेली आहे. शेतकऱ्यांचा आवाज बहिऱ्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी शिवसेना हंबरडा फोडणार आहे. शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत आणि कर्जमुक्ती मिळावी या मागणीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली 11 ऑक्टोबरला छत्रपती संभाजीनगरात विभागीय आयुक्तालयावर विराट हंबरडा मोर्चा काढला जाणार आहे.
अतिवृष्टीमुळे त्रस्त मराठवाडय़ातील शेतकऱ्यांना त्वरित थेट आर्थिक मदत मिळावी, संपूर्ण कर्जमुक्ती दिली जावी, पंजाब सरकारच्या धर्तीवर हेक्टरी 50 हजार रुपये देण्यात यावेत, पीक विम्याचे नवीन निकष रद्द करून पूर्वीचेच निकष कायम ठेवावेत, घरे आणि पशुधन नुकसानभरपाई तातडीने देण्यात यावी या मागण्यांसाठी 5 ते 11 ऑक्टोबर या कालावधीत शिवसेनेच्या वतीने मराठवाडय़ात आंदोलन केले जाणार असल्याची माहिती शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी दिली.
मोर्चाआधी गाव बैठका आणि निदर्शने
5 ते 7 ऑक्टोबर – ग्रामसभा, गावभेटी आणि गावबैठका
8 ऑक्टोबर – प्रत्येक तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आणि निदर्शने