
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याच्या फळभाजी पिकांचेही मोठे नुकसान झाल्याने घाऊक बाजारात आवक घटली आहे. त्यामुळे भाज्यांच्या किमतीत तब्बल दुप्पट वाढ झाली असून एक किलोच्या पैशात फक्त पाव किलोच भाजी मिळत आहे. परिणामी आधीच महागाईत होरपळणाऱ्या सर्वसामान्य मुंबईकरांना अतिवृष्टीचा चांगलाच फटका आणि चटका बसत आहे.
नाशिक, पालघरसह मराठवाडा, विदर्भात गेल्या काही दिवसांपासून पूरस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेले पीक वाहून गेले आहे. पावसाचा सर्वाधिक फटका पालेभाजी आणि फळभाज्यांना बसला आहे. यातील काही पिके कुजून गेली आहेत तर काही फळभाज्यांचा दर्जा घसरल्याने खाण्यायोग्य राहिलेली नाहीत. त्यामुळे व्यापाऱ्यांकडून मातीमोल दराने भाज्या खरेदी केल्या जात आहेत. तर मुसळधार पावसातही तग धरून राहिलेल्या पिकाच्या उत्पादनातून लागवड खर्चही निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. दरम्यान, महाराष्ट्राच्या विविध भागांतून येणाऱ्या भाजीपाल्याचे प्रमाण घटल्याने आता शेजारील राज्यांमधून येणाऱ्या भाज्यांवर गरज भागवली जात असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
घाऊक बाजारातील किमती
(प्रतिकिलो रुपयांमध्ये)
भाजी आधी आता
मटार 70 ते 80 120
गवार 70 120
कोथिंबीर जुडी 5 ते 10 25
वांगी 30 60
भेंडी 30 60
पालक 25 ते 30 50
दुधी 60 100
टोमॅटो 20 ते 30 40
गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे भाज्यांचे नुकसान झाल्याने एपीएमसी वाशी मार्केटमध्ये येणाऱ्या मालाचे प्रमाण 20 ते 25 टक्क्यांनी घटले आहे. मालाच्या कमतरतेमुळे भाज्यांचे दर दुपटीने वाढले आहेत. शंकर फडतरे, व्यापारी, वाशी मार्केट
बाजारात भाज्यांची आवक मोठी असताना गृहिणींकडून अर्धा ते एक किलो भाजांची खरेदी केली जायची. मात्र आता हेच ग्राहक पाव किलो भाजी खरेदी करीत असल्याचे प्रभादेवी मंडईतील विक्रेते साजन कुमार यांनी सांगितले.
किरकोळ बाजारातील किमती
(प्रतिकिलो रुपयांमध्ये)
भाजी आधी आता
मटार 100 240
गवार 80 120
काकडी 60 80
भेंडी 80 140
दुधी 60 100
पालक जुडी 20 60
मिरची 80 120
लसूण 120 200
कोबी 40 80
फ्लॉवर 60 100