
जर जगाच्या नकाशावर आपले स्थान टिकवून ठेवायचे असेल तर शेजारी देशाने आपल्या भूमीवर दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवावे. आता पूर्वीसारखा संयम दाखवणार नाही तर जगाच्या नकाशावरूनच पाकिस्तानचे नाव पुसून टाकू, असा इशारा हिंदुस्थानचे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी आज दिला.
हिंदुस्थानचे लष्करप्रमुख द्विवेदी यांनी शुक्रवारी राजस्थानच्या श्रीगंगानगर जिह्यातील घडसाना 22 एमडी गावातील सीमावर्ती भागाला भेट देऊन दहशतवादविरोधी तयारीचा आढावा घेतला. यावेळी लष्कर आणि बीएसएफ अधिकाऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्यासाठी सज्ज रहा, देवाची इच्छा असेल तर लवकरच ही संधी मिळेल. पाकिस्तानने दहशतवाद पसरवणे थांबवले नाही तर लवकरच ‘ऑपरेशन सिंदूर’चा दुसरा टप्पा सुरू केला जाऊ शकतो, असे लष्करप्रमुख म्हणाले.
हिंदुस्थान एक देश म्हणून, यावेळी पूर्णपणे तयार आहे. यावेळी, आम्ही ऑपरेशन सिंदूर 1.0 दरम्यान दाखवलेला संयम दाखवणार नाही. यावेळी आपण एक पाऊल पुढे टाकू आणि अशा पद्धतीने कृती करू ज्यामुळे पाकिस्तानला विचार करायला भाग पडेल की त्याला जगाच्या नकाशावर राहायचे आहे की नाही, असे लष्करप्रमुख द्विवेदी म्हणाले.
ऑपरेशन सिंदूरमध्ये दहशतवाद्यांचे नऊ अड्डे नष्ट
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने राबविलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेत हिंदुस्थानी लष्कराने पाकिस्तानचे नऊ दहशतवादी अड्डे नष्ट केले. या कारवाईत जवळजवळ 100 पाकिस्तानी लष्कराचे जवान आणि दहशतवादी मारले गेले. ऑपरेशन सिंदूरच्या यशाचे श्रेय लष्करी कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांना जाते, असे लष्करप्रमुख द्विवेदी म्हणाले.