‘दशावतार’ची जादू कायम, चौथ्या आठवड्यातही 200 शो हाऊसफुल्ल

कलेच्या माध्यमातून कोकणातील विदारक वास्तव मांडणाऱया ‘दशावतार’ची जादू चौथ्या आठवडय़ातही कायम आहे. मराठी रसिक प्रेक्षकांनी हा चित्रपट डोक्यावर घेतला असून महाराष्ट्रभरात तब्बल दीडशे चित्रपटगृहांत 200 च्या वर शो तुफान गर्दीत सुरू आहेत.

प्रदर्शनापासूनच ‘दशावतार’ची महाराष्ट्रात चर्चा आहे. समीक्षकांसह मान्यवरांनीही या चित्रपटाच्या विषयाचे आणि त्यातील कलाकारांच्या भूमिकेचे कौतुक केले. त्यामुळे दिवसागणिक चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढत आहे. पहिल्या तीन आठवडय़ांत भरभरून प्रतिसाद मिळालेल्या या चित्रपटाने चौथा आठवडाही गाजवला. परदेशातही हा चित्रपट गर्दी खेचत आहे. अमेरिकेत ‘दशावतार’चे शंभरहून जास्त शो सुरू आहेत, तर ऑस्ट्रेलिया, जपान, जर्मनी, आखाती देशांतही घोडदौड सुरू आहे. झी स्टुडिओ प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती ओशन फिल्म्सने केली आहे.

कोकणात बंद चित्रपटगृहे उघडली!

‘दशावतार’ने अनेक चित्रपटगृहांना हात दिला आहे. कोकणातील काही बंद चित्रपटगृहांची दारे ‘दशावतार’मुळे पुन्हा उघडली. तर काही चित्रपटगृहांनी पूर्ण वर्षभराची कमाई एकटय़ा ‘दशावतार’च्या जोरावर केली. काही खेडय़ांमध्ये कंटेनर थिएटर ‘दशावतार’ चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या दारात पोहोचले.

दशावतारी कलेची उत्सुकता वाढली!

‘दशावतार’ सिनेमामुळे कोकणातील दशावतारी कला प्रकाराविषयी उत्सुकता वाढली आहे. कोकण आणि गोव्यापुरते मर्यादित असलेल्या दशावतारी नाटकांना पुणे, मुंबईतूनही मागणी होत आहे. त्यामुळे दशावतारी कलाकारांना चांगले दिवस आले आहेत. या चित्रपटामुळे जनजागृतीही होत असून कोकणी माणूस आपल्या जमिनी, देवराया, कातळशिल्पे व निसर्ग वाचवण्यासाठी पुढाकार घेताना दिसत असल्याचे चित्र आहे.